आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलबलकाशी नाल्याची वाटचाल मिठीकडे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - साठलेला कचरा आणि काठावर भराव करून होत असलेल्या बांधकामामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणा-या बलबलकाशी नाल्याला मिठीनदीचे स्वरुप येण्याची शक्यता आहे. नाल्यात अडकून पडणा-या प्लॉस्टिक कच-यामुळे पाणी साचण्याचे प्रमाण वाढले आहे. नाल्याला डंपिंग ग्राऊंड होण्यापासून रोखण्यासाठी पालिका प्रशासनासह जबाबदार नागरिकांनी वेळीच पुढाकार घेणे गरजेचे आहे.
कधीकाळी शहराच्या लौकिकात भर घालणारा बलबलकाशी नाला आता वाढत्या शहरीकरणामुळे केवळ सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था बनला आहे. शहरातून निघणारा 15 टन कचरा उचलणे आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रभावी उपाययोजना नाही. त्यामुळे नाल्याजवळील रहिवासी घरातील कचरा थेट नाल्यात टाकतात. बाजारपेठ किंवा लहान-मोठ्या व्यावसायिकांच्या दुकानांवर निघणारा प्लॉस्टिक, थर्माकोल, प्लास्टर ऑफ पॅरिसचा कचरा नाल्यात किंवा नाल्याच्या काठावर टाकतात. यामुळे प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. नाल्यात टाकले जाणारे टाकाऊ पदार्थ पाण्यात विरघळणारे नसल्याने ते ठिकठिकाणी अडकतात. यामुळे मागील बाजूला पाणी साचून डासांचा उपद्रव वाढतो. दुर्गंधी सुटून त्याचा त्रास काठावरील रहिवाशांप्रमाणेच इतरही नागरिकांना होतो. नगरपालिकेने मागील आठवड्यात जामनेर रोडवरील पुलाजवळ नालेसफाई केली. केवळ पावसाळ््यापूर्वी होणारी सफाई हिवाळ््यात होताना दिसल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र, हे प्रयत्न अजून व्यापक बनविणे गरजेचे आहेत. शिवाय नाल्याच्या काठावर भराव अथवा अतिक्रमण होवून बांधकामे होत असतील तर ते वेळीच रोखणे पालिकेचे कर्तव्य आहे. पालिका पदाधिकारी त्याकडे कधी लक्ष देतात? याकडे लक्ष लागून आहे.
नाल्यावरच बांधले व्यापारी संकूल - खडका रोडवरील नाल्यावर रजा चौकात पालिकेने दहा वर्षांपूर्वी चक्क व्यापारी संकूल उभारले. यामुळे नाल्याच्या वहन कार्यात अडथळा येत आहे. संकुलाच्या गाळ्यांखालील गाळ, कचरा काढण्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही. यामुळे गाळ पुढे लोटला जात नाही. पर्यायाने सुहास हॉटेलपासूनचे पाणी या नाल्याच्या माध्यमातून रजा चौकापर्यंत येते. हा प्रकार आपत्तीला स्वत:हून बोलविण्यासारखा आहे.
काझी प्लॉटमध्ये परिस्थिती विदारक - काझी प्लॉट ते जाम मोहल्ला भागाला जोडण्यासाठी नाल्यावर पूल बांधण्यात आला होता. 2006 मध्ये पुलाच्या फाउंडेशनमध्ये गाळ अडकल्याने हा पूल कोसळला. असे असतानाही यातून वापर सुरूच होता. किरकोळ अपघातानंतर हा पूल पूर्णपणे काढून टाकण्यात आला. त्यानंतर पालिकेने कोणत्याही प्रकारची व्यवस्था केलेली नाही. सध्या तात्पुरत्या स्वरुपात नाल्यावर फरशी ठेवून वापर सुरू आहे. लहान मुले, अथवा वृद्ध खाली पडल्यास दुर्दैवाने हानी होण्याची शक्यता आहे.
शिवाजीनगरात नाल्यावर अतिक्रमण - बलबलकाशीसह शिवाजीनगरातून येणा-या नाल्यावर अतिक्रमणाचे प्रमाण जास्त आहे. खडका रोडवरील पुलाच्या दोन्ही बाजूंनी नाल्याचा आकार दिवसेंदिवस कमी होत आहे. या नाल्यावर रहिवाश्यांसाठी घरे बांधण्यात आली आहेत. परिसरातील रहिवासी आणि मटण विक्रेत्यांकडून घाण नाल्यातच टाकण्यात येते. यामुळे नाल्याचे सुशोभिकरण करण्याच्या पालिकेच्या मनसुब्यांवर पाणी फिरते. थोडक्यात नाल्यांची दिवसेंदिवस कमी होत जाणारी रूंदी व शहराला लागून असलेली तापी नदी पाहता पालिकेने दीर्घकालीन उपाययोजना करणे अपेक्षित आहे. कारण नाल्याचे पात्र अरूंद होत गेल्यास पाण्याच्या प्रवाहाला पुरेशी जागा मिळणार नाही. दाट वस्तीच्या भुसावळात हा प्रकार सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा नाही.