आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालगंधर्व महोत्सवास उद्यापासून प्रारंभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- खान्देशातील प्रचलित असा एकमेव संगीत महोत्सव असणाऱ्या ‘बालगंधर्व महोत्सवास जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. हा १३वा महोत्सव असून महाराष्ट्रातील सवाई गंधर्व महोत्सवानंतर बालगंधर्व महोत्सवाचेच नाव घेतले जाते. देशपातळीवरील शास्त्रीय संगीताच्या महोत्सवांच्या यादीत बालगंधर्वाचे नाव समाविष्ट झाले आहे.
गेल्या काही वर्षांपूर्वी भुसावळ शहरात खान्देश संगीत महोत्सव आयोजित केला जायचा. परंतु, कालांतराने तो बंद पडला आणि मग जळगावात एक तरी संगीताचा कार्यक्रम व्हायला हवा, असा विचार पुढे आला. तेव्हापासून या महाेत्सवाचा प्रवास सुरू झाला, तो आजपर्यंत अविरत सुरू आहे. आजच्या वेस्टर्न, रॅप संगीताच्या काळात लोप पावत चाललेल्या शास्त्रीय संगीताचे जतन करण्याचा प्रयत्न या महोत्सवातून केला जात आहे.
या महोत्सवाचा आतापर्यंतचा अतिशय रंजक असा प्रवास आहे. स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे हा महोत्सव १२ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला होता. चांदोरकर घराण्याने संगीत विद्येला वाहून घेतलेले असून त्यांनीच शास्त्रीय संगीताचा पाया जळगावात रोवला आहे. बालगंधर्वांचे नाते जळगाव शहराशी जुळले असल्याने त्यांच्या आठवणींसाठीच या महोत्सवाचे नाव बालगंधर्व ठेवण्यात आले आहेत. महोत्सवाची सुरुवात झाली, तेव्हापासून भारतातील कलावंतांना मनधरणी करून आणावे लागत असे. आता मात्र कलावंत स्वत:हून या महाेत्सवात सहभागी हाेण्यासाठी संपर्क साधत असतात, इथपर्यंत या महाेत्सवाचा यशस्वी प्रवास येऊन पोहोचला आहे. भारतातील अनेक नावाजलेले कलावंत यात सहभागी झाले आहेत. अशी एक तपाची परंपरा असणाऱ्या या महाेत्सवाचा अानंद यंदाही घेता येणार आहे.
नृत्यांगना नूपुर दैठणकर : पुणे (भरतनाट्यम‌्)
डॉ.स्वाती दैठणकर आणि प्रख्यात संतुरवादक डॉ. धनंजय दैठणकर यांची कन्या नूपुर लहान असल्यापासूनच नृत्याचे धडे गिरवू लागली हाेती. कलेबराेबर मानसशास्त्र या विषयात ती पदवीधर झाली अाहे. तिने नृत्य विशारद, नृत्य अलंकार पदव्यांसह मुंबई विद्यापीठातून मास्टर इन परफॉर्मिंग आर्टस् ही पदवी डिस्टिंगन्शनमध्ये प्राप्त केली आहे. नूपुरची आई गुरू डॉ. स्वाती दैठणकर यांच्यासह पद्मभूषण डॉ.कनक रेळे यांचे मार्गदर्शन तिला लाभले आहे. नूपुरने ‘नि:शब्द’ हा संगीत आणि नृत्य बॅलेवर अाधारित कार्यक्रम बसवलेला आहे. अशा कलावंतांची कला रसिकांना अनुभवायला मिळणार अाहे.
पंडिता डॉ. स्वाती दैठणकर : पुणे (भरतनाट्यम‌्)
पहिल्यादिवसाच्या दुसऱ्या सत्रात पुण्याच्या सुप्रसिद्ध नृत्यांगना पंडिता डॉ.स्वाती दैठणकर आणि त्यांची कन्या नूपुर यांच्या नृत्याच्या जुगलबंदीचा आनंद रसिकांना लुटता येईल. स्वाती यांनी साहित्य आणि भरतनाट्यम‌् या दोन्ही विषयात पदवी संपादन केली आहे. त्यांना ‘योगा आणि नृत्य महोत्सवात भरतनाट्यम‌्’ या विषयासाठी सरकारतर्फे फेलोशिप प्रदान करण्यात आली असून त्यांनी अमेरिका, सिंगापूर, जर्मनी, हॉलंडसह काही आखाती देशांतही नृत्याचे कार्यक्रम सादर केले आहेत. गंधर्व महाविद्यालय, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे विद्यापीठात त्या गुरू म्हणून कार्यरत आहेत. ‘कृष्ण लीला नाटकम्’ सृजन युगांतरा, तमसो मां ज्योतिर्गमय इ. नृत्य बॅलेंचे दिग्दर्शन त्यांनी केले अाहे. तसेच ‘सूर नागेश्वर’अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात अाले आहे.