आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रीय गायन अन‌् फ्युजनने श्रोते मंत्रमुग्ध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - चौदाव्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचा आरंभ कुमार गंधर्व यांच्या कन्या पंडिता कलापिनी कोमकली यांच्या शास्त्रीय उपशास्त्रीय गायनाने झाला. त्याचबरोबर सारंग कुलकर्णी यांनी सादर केलेल्या फ्युजनने तरुणाईला थिरकायला भाग पाडले. दोन्ही कलाकारांच्या सादरीकरणाने बालगंधर्व खुले नाट्यगृहात वातावरण नादमय झाले होते. तर त्यांच्या कलाविष्कारात श्रोते मंत्रमुग्ध झाले.
बालगंधर्व महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पंडिता कोमकली, दलीचंद जैन, शिरीष कोल्हे, प्रवीण गवई, डी. एस. शालीग्राम, दीपक चांदोरकर आदी उपस्थित होते. पंडिता कोमकली यांनी ‘देवो दान मोहे’ हा राग कल्याणवर आधारित बडा ख्यालने सादर करत महोत्सवाची सुरुवात केली. १७ वर्षांपूर्वी जळगावी आले होते. त्यानंतर आता येथे येत आहे. त्या वेळेसही महानोर उपस्थित होते, अशी आठवण कलापिनी यांनी या वेळी सांगितली. त्यानंतर ‘पिहरवा आवो तुम, सांज भई उदीत भयो’ या कुमार गंधर्व यांच्या ध्रुत रचना सादर केल्या. तर राग तिलक कमोदवर आधारित बंदीश सादर केली. ‘तीरथ को सब तर नदीरत’च्या सादरीकरणानंतर ‘यला या यला यललो’ हा तराणा सादर करण्यात आला. याप्रसंगी श्रोत्यांनी त्यांना सगुण निर्गुण भजन सादर करण्याची फर्माईश केली. त्यानुसार कोमकली यांनी संत तुकाराम यांचा ‘लक्ष्मी वल्लभा’ हा अभंग सादर केला. कबीराच्या रचनेने त्यांनी समारोप केला. कोमकली यांना संजय देशपांडे यांनी तबला, अभिषेक सिनकर यांनी संवादिनी, जुईली कलभंडे अनघा नाईक यांनी तानपुरा अशी साथसंगत केली.

सारंग कुलकर्णी यांनी मैफलीत रंग भरला
सारंगकुलकर्णी यांनी राग बागेश्री, पारंपरिक पद्धतीने आलाप, झाला, जोड सादर केला. त्यानंतर झपतालमध्ये निबद्ध रचना सादर केली. द्रुत तीन तालमध्ये चारूदत्त फडके शिखरनाद कुरेशी यांच्या साथसंगतीने बंदीश रंगली. त्यांना अमित गाडगीळ यांनी बेस गिटार तर सौरभ भालेराव यांनी की-बोर्डची साथसंगत केली. सारंग यांनी मॉडीफाय केलेले सरोद ज्याचे नामकरण उस्ताद तौफिक कुरेशी यांनी झरोद असे केले आहे. त्याने मैफलीत रंगत आणली.