आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदी धुडकावून ट्रॅव्हल्सची बेलगाम टप्पा वाहतूक, ५० खासगी बसेस सुसाट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव; टप्पा वाहतुकीवरील बंदी धुडकावून खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या नियमांतील त्रुटींचा फायदा घेत बेलगाम वाहतूक करत असून जळगाव शहरातूनच सुमारे ५० पेक्षा अधिक बसेस टप्पा वाहतूक करीत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
अर्धशिक्षित आणि अप्रशिक्षित चालक, खचाखच भरलेले प्रवासी आणि जास्त प्रवासी मिळवण्यासाठी चाललेली धडपड, यामुळे अनेक वेळा सुसाट वेगात धोकादायक पद्धतीने ही वाहतूक सुरू असते, असे दिसून आले आहे.
प्रवासी मिळवण्याच्या बेलगाम शर्यतीमुळेच शुक्रवारी दोन प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागल्याचे स्पष्ट झाले आहे. खासगी बसेसच्या बेलगाम वाहतुकीमुळे राज्य परिवहन महामंडळ (एसटी)च्या उत्पन्नाला फटका बसतो.
कंडारीजवळ शुक्रवारी एसटीला ओव्हरटेक करून पुढे जाताना एक खासगी बस उलटली होती. यात एका चार वर्षीय चिमुकल्यासह दोन जण ठार झाले. या अपघातानंतर टप्पा वाहतुकीची समस्या पुन्हा ऐरणीवर आली आहे. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने शनिवारी खासगी ट्रॅव्हल्सच्या टप्पा वाहतुकीचा आढावा घेतला असता, धक्कादायक बाबी समोर आल्या. टप्पा वाहतुकीवर कायद्याने बंदी आहे. परंतु टुरिस्ट परवाना घेऊन खासगी वाहनचालक-मालक सर्रास टप्पा वाहतूक करतात. हा परवाना दोन दिवसांचा असतो, पण दर दोन दिवसांनी परवान्याचे नूतनीकरण करून टप्पा वाहतुकीच्या बंदीवर कायदेशीर मार्ग काढला जात आहे. याच परवान्यावर वर्षभर वाहतूक केली जाते.
विशेष म्हणजे अधिकारी -कर्मचारी कमी असल्याचे कारण पुढे करून राज्य परिवहन खातेही (आरटीओ) याकडे कानाडोळा करते. त्याचा फायदा ट्रॅव्हल्स कंपन्या उचलतात. नेरीनाका येथील खासगी टप्पा थांब्यावरून दररोज जामनेर, पहूर, शेंदुर्णी, लोहारा, पाचोरा येथे वाहतूक केली जाते. आरटीओच्या नियमांनुसार ट्रॅव्हल्ससाठी टप्पा वाहतूक बंद करण्यात आली आहे. आरटीओकडून टप्पा वाहतूक बंद असल्याचा दावादेखील केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र टप्पा वाहतूक सर्रास सुरू असल्याने अारटीअाेंच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सुरक्षेचाप्रश्न : टप्पावाहतूक करणाऱ्या बसेसमध्ये जास्तीत-जास्त प्रवासी बसवण्यासाठी दोन सीटमध्ये असलेले अंतर कमी केले आहे. त्यामुळे क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी बसवले जातात. तसेच एसटीप्रमाणे दैनंदिन पासही दिले जातात.

४०टक्के उत्पन्नावर पाणी : खासगीटप्पा वाहतुकीमुळे एसटी महामंडळाला एकूण ४० टक्के उत्पन्नाला मुकावे लागते. पोलिस आणि आरटीओ विभागाकडून कारवाई होणे अपेक्षित असते. महामंडळ बसस्थानकाबाहेर फारशी उपाययाेजना करू शकत नाही. त्यामुळे केवळ खासगी वाहनांच्या टप्पा वाहतुकीपाेटी महामंडळाला ४० टक्के उत्पन्न बुडवावे लागत आहे, असे आगारप्रमुख एस.बी.खडसे यांनी सांगितले.

कारवाईसुरू आहे :लक्झरी बसला टप्पा वाहतूक करण्यास बंदी आहे. मात्र, दोन दिवसांचे परवाने काढून काहीजण अवैधरित्या वाहतूक करीत आहेत. यासंदर्भात कारवाई सुरू आहे. काही वाहने जप्त करण्यात आली आहेत, असे सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व्ही. पी. बऱ्हाटे यांनी सांगितले.

नियम काय सांगतो?
महाराष्ट्रराज्यात शासनाने २९ नाेव्हेंबर १९७३ च्या अधिसूचनेद्वारे संमत केलेल्या या योजनेनुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास कंत्राटी टप्पा वाहतूक सेवा पुरवण्यासाठी मक्तेदारी बहाल केली आहे. या योजनेतून काही घटकांना वगळण्यात आले आहे. यात राज्य परिवहन उपक्रमांचा समावेश आहे. महापालिका, नगर परिषद यांचा राज्य परिवहन उपक्रमांच्या व्याख्येत समावेश होतो. त्यामुळे इतर कोणत्याही खासगी वाहनास टप्पा वाहतुकीस परवानगी नाही.

काय आहे टप्पा वाहतूक?
दोनशहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या गाडीने त्या मार्गावर प्रत्येक गावात थांबून प्रवासी घेतल्यास ती टप्पा वाहतूक समजली जाते. खासगी लक्झरी चालकांना फक्त ‘पॉइंट टू पॉइंट’ सेवेची अर्थात एका गावाहून थेट दुसऱ्या गावापर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे. टप्पा वाहतुकीवर बंदी असूनही खासगी बसेस खुलेआम एका शहरातून निघाल्यानंतर मार्गावरील प्रत्येक गावात बस थांबवून प्रवासी घेतात.

चुकीचे तिकीट देणारी बस जप्त
सकाळच्यावेळेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दुपारची वेळ नमूद केलेले तिकीट दिले जात आहे. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने शनिवारी वृत्त प्रसिद्ध केले. तक्रारदार रवींद्र लिंगायत यांनी आरटीओ विभागाकडे लेखी तक्रार केली आहे. यावर आरटीओनी तातडीने ट्रॅव्हल्स मालकावर कारवाई केली असून एसटी वर्कशॉप येथे ट्रॅव्हल्स गाडी जप्त करण्यात आली आहे. ट्रॅव्हल्सचालकावर दंडात्मक कारवाईदेखील करण्यात आली आहे.