यावल- तालुक्यातील पश्चिम भागात रविवारी सायंकाळी गारपिटीसह वादळी पाऊस झाला होता. या आपत्तीचा शेकडो हेक्टर शेतीला फटका बसून १०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सोमवारी तहसीलदार कुंदन हिरे या नुकसानीची पाहणी केली. यानंतर सुमारे ६० लाख नुकसानीचा प्राथमिक अंदाज समोर आला.
तालुक्यातील पश्चिम भागात रविवारी सायंकाळी अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. डांभूर्णी, डोणगाव, चिंचोली, मनवेल या परिसराला सर्वाधिक फटका बसला. कापणीयोग्य केळी, कापणी योग्य झालेला मका, कांदा, ऊस सह आदी पिकांचे नुकसान झाले.सोमवारी तहसीलदार कुंदन हिरे, मंडळाधिकारी तुषार घासकडबी, कृषी मंडळाधिकारी व्ही.ई.पाटील यांच्यासह स्थानिक तलाठी या पथकाने प्रत्यक्ष शेतात पाहणी नुकसानीची पाहणी केली. तहसीलदारांनी तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. उंटावद परिसरात किनगावचे शेतकरी सुरेश सोनवणे यांचा हजारो रूपयांचा कडबा विज पडून जळाला.
दरम्यान, प्राथमिक अंदाजानुसार सोमवारी ६८ हेक्टर क्षेत्रावरील १४६ शेतकऱ्यांच्या केळी मका पिकांच्या नुकसानीची माहिती घेण्यात आली. त्यात ६० लाख ५० हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज समोर आला. मात्र, त्यात अजून वाढ होऊ शकते.
विमा कंपनीला कळवावे
ज्या शेतकऱ्यांनी केळीसह इतर पिकांचा विमा काढला असेल, त्यांनी रविवारी झालेल्या नुकसानीबाबत ४८ तासांच्या आत संबंधित विमा कंपनीला माहिती द्यावी. एखाद्या पिकाचा विमा काढलेला असल्यास शासनाकडून नुकसानभरपाई दिली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी. कुंदन हिरे, तहसीलदार, रावेर