भुसावळ - उन्हाळ्यात बाजारात आंब्यासह हंगामी फळांचे आगमन झाल्याने केळीला मागणी नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. फेब्रुवारीत तब्बल 1 हजार 350 रुपये प्रतिक्विंटलचे भाव अडीच महिन्यांत निम्मे कमी झाले. सध्या केळीला केवळ 625 रुपये तर कांदेबाग, पीलबागच्या केळीला 500 रुपये भाव मिळत आहे.
एप्रिल महिन्यापासून केळीची आवक चांगल्या प्रकारे वाढली. या पाठोपाठ भावही झपाट्याने पडले. 12 फेब्रुवारी रोजी केळीच्या भावाने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. 1 हजार 350 रुपये प्रतिक्विंटल आणि 25 रुपयांचा फरक असा भाव मिळाला. या मुळे चांगल्या दर्जाची केळी थेट दीड हजार रुपये क्विंटलपर्यंत विक्री झाली. या वाढत्या भावाचा लाभ मात्र बोटावर मोजण्याइतक्याच शेतक-यांना झाला. थंडीमुळे अत्यल्प निसवण झाली. फेब्रुवारी अखेरपर्यंतही केळीचे भाव टिकून होते. एप्रिल महिन्याची सुरुवात झाल्यानंतर उन्हाचा तडाखा वाढला. या मुळे केळीची निसवण होण्याचे प्रमाण वाढले. या पाठोपाठ चढे दरही कमी-कमी होत गेले. एप्रिल महिन्यात हे दर 800 रुपयांपर्यंत येऊन ठेपले. गेल्या चार दिवसांपर्यंत केळीचे भाव 625 रुपयांवर स्थिरावले आहेत. सध्या बाजारात आंब्याची विक्रमी आवक झाली आहे. दरही कमी असल्याने आंब्याची मागणी वाढली आहे. यासह अननस, संत्री, मोसंबी, टरबूज, खरबूज आदी हंगामी फळांना अधिक मागणी आहे. या मुळे केळीची मागणी अत्यंत कमी झाली आहे. दिल्ली आणि उत्तर भारतातही केळीला मागणी नसल्याने व्यापारीकरणावर परिणाम झाला आहे.
रमजानमध्ये भाववाढीचे संकेत
मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना 30 जूनपासून सुरू होणार आहे. रमजानच्या उपवास काळात केळीची मागणी वाढते. दरम्यान, केळीचे भाव या काळात वाढतील, असा अंदाज आहे. मात्र, अजूनही किमान पावणेदोन महिन्यांचा अवधी असल्याने उत्पादक चिंतेत आहेत. कवडीमोल भावात केळी द्यावी लागत आहे.
वाढत्या तापमानाचा फटका
रावेर आणि यावल तालुक्यातील तापमान 42 अंशांपर्यंत पोहोचले आहे. या मुळे केळीचे घड सटकणे, झाड अर्ध्यातून तुटणे आदी प्रकार वाढले आहेत. तापमानामुळे निसटलेले घड व्यापारी खरेदी करत नाहीत. परिणामी शेतक-यांना नुकसान सहन करावे लागते. कमी भाव, त्यातही तापमानामुळे होणारे नुकसान या दुहेरी चक्रात केळी उत्पादक भरडला जात आहे.
हक्काची बाजारपेठच नाही
बाजारात अस्थिरता असल्याने केळी उत्पादकांना शाश्वत उत्पन्न मिळण्याची आशा नसते. शासनाने प्रक्रिया उद्योगही सुरू केल्यास हक्काची बाजारपेठ मिळून शेतक-यांना फायदा होईल. राजकीय पदाधिकारी मात्र उदासीन असल्याचे दु:ख उत्पादकांना आहे.
कडू पाटील, प्रगतीशील शेतकरी, किनगाव