आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळातील निम्म्याहून अधिक एटीएम मशीन बंद; बँकांमध्ये गर्दी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- कामगार आणि मोठा व्यापारी वर्ग असलेल्या भुसावळ शहरात विविध बँकांची 18 एटीएम कार्यरत आहेत. विशेष म्हणजे या सर्व एटीएमपैकी निम्म्याहून अधिक एटीएम मशीन बंद आहेत. यामुळे ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वेतन काढणार्‍या नोकरदारांचे प्रमाण अधिक असल्याने शहरातील एटीएम सेवा अखंडित राहणे गरजेचे आहे. मात्र, कॅश संपणे, नेटवर्क नसणे यासारख्या तांत्रिक कारणांनी एटीएम सेवा बंद होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच शहरातील उत्तर भागात एकाही बँकेचे एटीएम सेवा नसल्याने ग्राहकांना पायपीट करावी लागते.

भुसावळ शहर रेल्वेचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. त्याचप्रमाणे विभागातील सर्वात मोठे व्यापारी केंद्र असल्याने जिल्हाभरातील व्यापार्‍यांचा शहरात राबता असतो. त्यामुळे विविध बँकांनी व्यवसायाची संधी ओळखत 18 ठिकाणी एटीएम बसवले आहेत. मात्र, यातील बहुतांश एटीएम तांत्रिक कारणांमुळे बंद असल्याने ऐनवेळी अडचणीचा सामना करावा लागत आहे. रेल्वे आणि आयुध निर्माणी परिसर वगळता शहरातील उत्तर भागात एकाही बँकेचे एटीएम नाही. यामुळे शांतीनगर, सातारा परिसर, जळगावरोड, तापीनगर या भागातील नागरिकांना रेल्वे पुलाच्या दक्षिणेकडील भागात जावे लागते.

इतरांच्या तुलनेत एसबीआयची सेवा तुलनेने चांगली असल्याचे ग्राहकांचे मत आहे. यामुळे एसबीआयच्या एटीएमवर ग्राहकांची प्रचंड गर्दी होते. या गर्दीमुळे पैसे काढण्यासाठी ग्राहकांना ताटकळत रांगेत उभे रहावे लागते.

खाते उघडण्यासाठी बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी
गॅस वापरावर सरकारतर्फे मिळणारी सबसिडी 1 एप्रिलपासून थेट ग्राहकांच्या खात्यात जमा होणार आहे. यामुळे राष्ट्रीयकृत बॅँक ांमध्ये खाते उघडण्यासाठी गॅस सिलिंडर असलेल्या ग्राहकांची गर्दी होत आहे. सरकारने नवीन धोरणांची आखणी करताना प्रत्येक गॅस ग्राहकाला फक्त एकच कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेक ग्राहकांनी आपले अतिरिक्त कनेक्शन संबंधित एजन्सीकडे जमा केले. केवळ सबसिडीसाठी राष्ट्रीयकृत बँकेचे खातेच नव्हे, तर आधार कार्ड काढण्यासाठी सुद्धा नागरिकांची धावपळ सुरू आहे. कारण बँकेच्या खातेक्रमांकासह आधार क्रमांक सबसिडीसाठी आवश्यक आहे.

‘आयडीबीआय’ मध्ये 1500 खाती
सप्टेंबर 2012 ते जानेवारी 2013 या पाच महिन्यांच्या काळात आडीबीआय बँकेत नवीन 1500 ग्राहकांनी खाती उघडली आहेत, अशी माहिती बँकेचे व्यवस्थापक मंगल पाठक यांनी दिली. स्टेट बँकेनेही शहरातील शाखेच्या वरच्या मजल्यावर खाते उघडण्याची सोय केली आहे.