आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा बँक निवडणूक आखाडा : उमेदवारीसाठी सहनिबंधकांकडे धाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- तांत्रिक गोष्टींची पूर्तता केल्यामुळे अनपेक्षितरीत्या जिल्हा बँकेच्या निवडणूक आखाड्यातून बाहेर पडलेल्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज टिकण्यासाठी विभागीय सहनिबंधकांकडे धाव घेतली आहे. शनिवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सुनावणीमध्ये अर्ज बाद ठरल्याचे आदेश घेऊन त्यावर सोमवारी नाशिक येथे विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल करण्यात येणार आहे. त्यांनी ते फेटाळल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा रस्ता मोकळा होणार आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत तब्बल १०० उमेदवारी अर्ज बाद ठरले. त्यातील २० उमेदवारी हे राजकीय क्षेत्रात दिग्गज असून त्यांनी निवडणुकीची आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे. काही जणांना विजयाची खात्री असली तरी तांत्रिक बाबींवर उमेदवारी टिकल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बाद ठरलेल्या उमेदवारी अर्जावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी विभागीय सहनिबंधक आणि न्यायालय हे मार्ग हातचे ठेवले आहेत.
निवडणुकीपूर्वी न्यायालयीन लढाई
उमेदवारीबाद ठरलेले उमेदवार विभागीय सहनिबंधकांकडे तसेच न्यायालयात जाणार आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे विरोधक असलेल्या उमेदवारांनीही त्यांच्या विरोधात बाजू मांडण्यासाठी सहनिबंधक न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. छाननीत बाद ठरलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी मिळू नये विजयाचा मार्ग सोपा व्हावा, म्हणून न्यायालयीन लढ्यासाठी उमेदवार निवडणुकीपूर्वीच सज्ज झाले आहेत. अर्ज बाद झालेल्यापैकी आमदार उन्मेष पाटील, आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार महेद्रसिंग पाटील, बाळासाहेब पाटील, प्रताप हरी पाटील हे अपिलात जातील, तर अर्ज बाद झाल्यामुळे विजयाचा मार्ग सुकर झालेल्यापैकी बँकेचे विद्यमान अध्यक्ष चिमणराव पाटील, विद्यमान संचालक प्रदीप देशमुख, अनिल भाईदास पाटील, नानासाहेब देशमुख हेदेखील अर्ज बाद झालेल्या राजकीय विराेधकांना न्यायालयाकडून दिलासा मिळू नये, म्हणून बाजू मांडण्याच्या तयारी आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच न्यायालयीन लढ्यात परस्पर विराेधक समोरा-समोर येतील.
सर्वपक्षीय समितीची बैठक शक्य
जिल्हामध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल तयार करण्यासाठी नियुक्त करण्यात अालेल्या समितीची रविवारी बैठक हाेण्याची शक्यता अाहे. पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत जळगाव किंवा मुक्ताईनगर येथे दुपारी ही बैठक हाेईल. काही जागा बिनविराेध झाल्याने उर्वरित जागांसंदर्भात या बैठकीत अंतिम चर्चा हाेईल, असा विश्वास समितीच्या सदस्यांनी व्यक्त केला अाहे.