आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसे काढण्यासाठी एटीएम, बँका हाऊसफुल्ल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - हजारपाचशेच्या नोटा बंद केल्याने तसेच एटीएमही बंद असल्याने बुधवारी दिवसभर बेजार झालेल्या नागरिकांची गुरुवारी (दि.१०) नोटा बदलणे एटीएममधून पैसे काढण्यासाठी अक्षरश: झुंबड उडाली होती. पोलिस बंदोबस्तात पैसे स्वीकारणे तसेच एटीएममधून काढण्यात येत होते. सकाळपासून लागलेल्या या रांगा सायंकाळपर्यंत कायम असल्याने बँकेतील अधिकारी, कर्मचारी मात्र चांगलेच बेजार झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून सध्या चलनात असलेल्या पाचशे एक हजार रुपयांच्या नोटा बाद केल्याची घोषणा केली आणि देशभरात यामुळे एकच धावपळ उडाली. एकीकडे नोटा बाद ठरविल्या आणि दुसरीकडे दोन दिवसांकरिता बँका, एटीएम बंद ठेवल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. खिशात हजार, पाचशेच्या नोटा असूनही ते चहा, पाण्यालाही महाग झाले होते. दुसरीकडे बँकांबाहेर बंदचे बोर्ड आणखीनच अस्वस्थता निर्माण करत होते. उस्मानाबाद शहरासह जिल्हाभरातील बाजारपेठा यामुळे ठप्प झाल्या होत्या. काहींनी शक्कल लढवून बँकेतून पैसे स्वीकारले जाणार असल्याने मंगळवारी मध्यरात्रीपासून बाद ठरविण्यात आलेले चलनही स्वीकारून व्यवसाय केला. गुरुवारी मात्र शहरातील बँकांनी नागरिकांजवळील नोटा स्वीकारण्यास प्रारंभ केला. दुसरीकडे हैदराबाद स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीएममधून नवीन दोन हजार रुपयांच्या नोटांचे वितरण सुरू झाल्याने पैसे भरण्याबरोबरच काढण्यासाठीही हजारो नागरिकांची एकाच वेळी झुंबड उडाली. परिणामी बँकांमध्ये तसेच दोन्ही एटीएमबाहेर लांबपर्यंत नागरिकांच्या रांगा दिवसभर कायम होत्या.

दुसऱ्याही दिवशी गैरसोय
सुट्यापैशाच्या कारणावरून बाजारपेठेत दुसऱ्याही दिवशी ग्राहकांची मोठी गैरसोय झाली. व्यापाऱ्यांनीही समोरील ग्राहक कितीची खरेदी करतोय यावर मोठ्या नोटा स्वीकारण्याचे धोरण अवलंबले. यामुळे किरकोळ खरेदीदाराला दुसऱ्याही दिवशी अडचणींना तोंड द्यावे लागले. बँकेतूनही दोन हजार रुपयांच्या नोटा मिळाल्या असल्या तरी बाजारपेठेत त्या चलवताना परताव्यासाठी व्यावसायिकांकडे चलन नसल्याने त्याही गुरुवारी तरी निष्फळ ठरल्याचे दिसून आले.

पैसे भरण्यासाठीही गर्दी
गुरुवारी सकाळपासून शहरातील बँकांनी नागरिकांकडील पाचशे हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास प्रारंभ केला. तसेच स्टेट बँक ऑफ हैदराबाद स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा बसस्थानक येथील एटीएममधून नव्याने दाखल झालेल्या दोन हजारांच्या नोटा वितरित होण्यास प्रारंभ झाल्याने नागरिकांनी अक्षरश: तोबा गर्दी केली होती.

पोलिस बंदोबस्तात पैसे वितरण
नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन बँकांनी अगोदरच पोलिस बंदोबस्ताची व्यवस्था केली होती. यामुळे बँकेसह एटीएमसमोर पोलिस बंदोबस्तात नागरिकांचे पैसे स्वीकारणे वितरण सुरू होते. एटीएमसमोरील गर्दीमुळे अनेकवेळा ग्राहक पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये वादावादीच्याही घटना घडत होत्या. हीच परिस्थिती दिवसभर कायम होती.
पतसंस्था, मल्टीस्टेटमध्ये मोठ्या रकमांसाठी विचारणा
मंगळवारी मध्यरात्रीपासून मोठ्या नोटांवर बंदी येताच घरात साठेबाजी झालेल्या या नोटांचे नियोजन कसे करायचे असा प्रश्न शहरासह जिल्हाभरात अनेकांना पडल्याचे दिसून आले. यासाठी अनेकजण संबंधातील पतसंस्थांशी संपर्क साधून मूदतठेवीसाठी विनंती करताना दिसून येत होता. यामध्ये शहरातील एकेका संस्थेला पन्नास लाखांपर्यंतच्या रक्कमांची मूदतठेवीची ऑफर आली होती. परंतु, याबाबतचे धोरण स्पष्ट नसल्याने तसेच बँकेत रक्कम भरताना होणारी अडचण लक्षात घेऊन बहुतांश जणांनी याला नकार दिला.
बातम्या आणखी आहेत...