जळगाव - केवायसीसंदर्भातील बँकेचे धोरण खातेदारांना चांगलेच अडचणीचे ठरत आहे. दोन ते तीनवेळा केवायसीसाठी कागदपत्रे देऊनही ग्राहकांचे खाते ‘इनव्हॅलिड’ दाखवत आहे. केवायसीचा गुणांकन ग्राहकांच्या पचनी पडत नसल्याने ग्राहकांना वारंवार बँकांमध्ये चकरा माराव्या लागत आहेत.
प्रत्येक बँक खातेदाराला केवायसी आवश्यक केले आहे. येत्या ऑक्टोंबरपासून केवायसी नसलेले खाते बंद करण्याची कारवाई केली जाणार आहे. तोपर्यंत सर्व खाती केवायसी करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आरबीआयचे आदेश आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून केवायसीची प्रक्रिया राबवली जात आहे. या वेळी असंख्य ग्राहकांनी केवायसीची प्रक्रिया केली होती. मात्र, आता रिझर्व्ह बँकेच्या नव्या धोरणानुसार केवायसीला गुणांकन देण्यात आले आहे. कागदपत्रांनुसार गुणांकन देण्यात आले आहे. केवायसीची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 110 गुण आवश्यक आहेत. 110पेक्षा कमी नाही आणि त्यापेक्षा अधिकही गुण नको. 110 गुण असतील तरच ते खाते व्हॅलिड होणार आहे. या नव्या निकषामुळे पूर्वी केवायसी केलेल्या ग्राहकांची खाती इनव्हॅलिड झाली आहेत. त्यामुळे आता त्यांनाही नव्याने केवायसी करावे लागणार आहे.
केवायसीसाठी स्टेट बँकेत एकच कर्मचारी नियुक्त केला आहे, मागील आठवडाभरापासून केवायसीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे. मात्र, अजूनही ग्राहकांच्या पचनी 110 गुणानुक्रम पचनी पडत नसल्याची स्थिती आहे. एकाच ठिकाणी ग्राहकांची गर्दी होत आहे. बर्याचदा हा कर्मचारी जागेवर नसल्यास ताटकळत उभे राहावे लागते. या प्रक्रियेसाठी किमान दोन-तीन कर्मचार्यांची नियुक्ती करण्याची नागरिकांची मागणी आहे.
चुकीच्या पत्त्यामुळे नोटीस परत
केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी केवायसी नसलेल्या ग्राहकांना नोटीस बजावल्या जात आहेत. प्रत्येक दिवशी किमान 600 जणांना नोटीस पाठवल्या जात आहेत. त्यापैकी 150 ते 200 नोटीस परत येत आहेत. पत्ते चुकीचे असल्यामुळे बँकेला नोटिसीचा भुर्दंड सोसावा लागत आहे. दोन वेळा बँकेकडून नोटीस पाठवली जाईल. त्यावर प्रतिसाद न मिळाल्यास ती सर्व खाती बंद करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
ग्राहकांनी हे करावे
केवायसी करताना एखादा कागद जास्तीचा सादर केला गेला तरी खाते इनव्हॅलिड दाखवत आहे. त्यामुळे ग्राहकांनी 110 गुण होतील एवढीच कागदपत्रे सादर करावी. केवळ आधारकार्ड दिले तरी केवायसीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. ग्राहकांनी कोणत्या कागदपत्रांना कसे गुण आहेत हे पाहूनच कागदपत्रे द्यावी.