आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धूळे शहरातील बॅनर हटविण्यासाठी होणार झोन निर्मिती, सहा सदस्यांची समिती करणार पाहणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - फलक बॅनरमुळे होणारे शहराचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी बॅनरमुक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता शहरातील मोजक्याच जागांवर बॅनर लावण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्यासाठी झोनची निर्मिती करण्यात येणार आहे. महापालिकेने यासाठी सहा सदस्यांची समिती गठीत केली आहे. या समितीतर्फे शहरात बॅनर झोन तयार करण्यात येतील.

शहरात बॅनर लावण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची आणि ज्या ठिकाणी बॅनर लावण्यात येणार आहे, त्या जागामालकाची परवानगी घेणे महत्त्वाचे असते. मात्र, फलक बॅनर लावण‌ाऱ्यांकडून या नियमाचे पालन होत नाही. त्यामुळे महत्त्वाचे चौक, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर बॅनर लावण्यात येत असल्याने शहराचे विद्रूपीकरण होते. चौकात लावण्यात आलेल्या बॅनरमुळे वाहनधारकांना रस्ता दिसल्याने अपघातही होतात. त्यासाठी बॅनरमुक्त शहर करायचे, असा निर्णय घेण्यात आला आहे.
वाहतुकीला अडथळा होणार नाही आणि विद्रूपीकरण टळेल अशा ठिकाणी रीतसर परवानगी घेऊन बॅनर लावण्यात यावे. अन्य ठिकाणी बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आणि त्यासाठी नागरिकांना तक्रारी करता याव्यात यासाठी टोल फ्री क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले आहे. तसेच योग्य पद्धतीने कार्यवाही होते किंवा नाही याबाबत पाहणीसाठी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि इतर महत्त्वाच्या शासकीय अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार मनपाकडून बॅनर लावण्याच्या जागा निश्चितीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीची टाऊन प्लॅनिंग विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन त्यावर प्रस्तावित बॅनर झोनच्या जागांवर चर्चा होईल.

समितीत यांचा आहे समावेश
महापालिकेने नियुक्त केलेल्या या समितीचे अध्यक्ष सहायक आयुक्त एच. पी. कवठळकर हे आहेत. समितीत तीन सहायक आयुक्त त्र्यंबक कांबळे, हेमलता डगळे, बी. बी. गिते, नगररचना विभागाचे अभियंता कैलास शिंदे, वसुली अधीक्षक यांचा समावेश आहे. हीच समिती यापुढे शहरात कुठे पलक लावायचे याचा निर्णय घेईल.
१७ ठिकाण प्रस्तावित
शहरातील विविध भागातील सतरा जागांवर बॅनर झोन तयार करण्याचे प्रस्तावित आहे. नगररचना विभागाकडून या जागांची माहिती समितीला देण्यात आली आहे. त्यावर चर्चा झाली असून, लवकरच जाहिरातदार संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक समितीबरोबर होऊन त्यावर याबाबत चर्चा झाल्यानंतर जागा निश्चित केल्या जाणार असल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली.
चौकांमधील अडचण होईल कमी
शहराच्या प्रत्येक चौकात फलकांची अद्यापही अडचण झालेली दिसते. महापालिकेने परवानगी घेण्याचा कायदा केला. पण कोणीही परवानगी घेत नाही. त्यामुळे बऱ्याचदा वादग्रस्त स्थिती निर्माण होते. यातून महापालिकेचा महसूलही बुडतो. त्यासाठी समिती देखभाल करणार आहे. समितीच्या नजरेतून कोणतेही फलक सुटणार नाही, याची कालजी समितीला घ्यावी लागणार आहे.