चाळीसगाव- अर्ज माघारीनंतर निवडणुकीचा ज्वर खऱ्या अर्थाने वाढला असून, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात पंचरंगी लढत होईल. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराचा कस लागणार आहे. वाडीलाल राठोड, कैलास सूर्यवंशी रवींद्र चुडामण पाटील या तिघांनीही माघार घेतल्याने भाजपच्या गोटातील अस्वस्थता दूर झाली आहे. तीनदा खासदार आणि केंद्रात एकदा मंत्रिपद मिळवलेले एम.के.पाटील यांनी
आपल्या पुत्राच्या रूपाने भाजपचे कमळ खाली ठेवत शिवसेनेचा धनुष्य हातात घेतला आहे.
एम.के.पाटलांसमोर शिव‘धनुष्य’ पेलण्याचे आव्हान
राष्ट्रवादीचेआमदार राजीव देशमुख, भाजपचे उन्मेष पाटील, शिवसेनेचे रामदास पाटील, मनसेचे राकेश जाधव कॉंग्रेसचे अशोक खलाणे यांच्यातील पंचरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले असले तरी, राष्ट्रवादी भाजप उमेदवारातच काट्याची लढत होईल. या दोघांसह रामदास पाटील यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराची एक फेरी ग्रामीण भागात पूर्ण केली होती. भाजपकडून अर्ज माघार घेतलेल्या तिघांशिवाय एम.के.पाटील यांचे चिरंजीव रामदास पाटील हेदेखील उत्सुक होते. मात्र, उमेदवारी मिळत नसल्याचे संकेत प्राप्त होताच एम.के.पाटील यांनी ऐनवेळी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून मुलाला शिवसेनेच्या तंबूत दाखल केले. शिवसेनेकडून अंबरनाथचे उपनगराध्यक्ष रमेश गुंजाळ यांच्या नावाची चर्चा होती त्यासाठी त्यांनी मातोश्रीवर प्रयत्नही केले. मात्र, शेवटच्या घटकाला उमेदवारीची माळ रामदास पाटील यांच्या गळ्यात पडली. तीन टर्मचा खासदारकीचा अनुभव पाठीशी घेऊन एम.के.पाटील यांनी हे शिव‘धनुष्य’ उचलले असून, ते त्यांना पेलवते काय? हे मतपेटीतून स्पष्ट होईल. आपण भाजपशी फारकत घेतली असून, शिवबंधन बांधले असल्याचे पाटील यांनी पातोंडा येथील प्रचारसभेत स्पष्ट केल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील घालमेल संपली आहे. याउलट परिस्थिती राष्ट्रवादीत होती. सुरुवातीपासून उमेदवारीसाठी राजीव देशमुख यांचेच नाव चर्चेत होते.
माघारीनंतर मतदारसंघातील चित्र
मनसे अन् काँग्रेसचे आव्हान
यामतदारसंघात मनसेचे राकेश जाधव कॉंग्रेसचे अशोक खलाणे यांनीदेखील आव्हान उभे केले आहे. तालुक्यात मराठा समाजानंतर बंजारा माळी समाजाचे प्राबल्य असून, हे दोघे उमेदवार इतर मतदारांशिवाय आपापल्या समाजाची किती मते स्वत:च्या पारड्यात टाकण्यात यशस्वी होतात, हे येणारा काळच ठरवेल.
दुभंगलेल्या कार्यकर्त्यांना एकत्र करण्याची मोठी सत्त्वपरीक्षा
उमेदवारीसाठीभाजपतील गटातटाचे राजकारण कार्यकर्त्यांसाठी डोकेदुखी बनले होते. तसेच सर्वच इच्छुकांनी स्वतंत्रपणे प्रचार सुरू केल्याने कोणाच्या तंबूत दाखल व्हायचे? ही चिंता कार्यकर्त्यांना सतावत होती. त्यामुळे कार्यकर्ते दुभंगले होते. कैलास सूर्यवंशी यांचे नाव जाहीर होईल, असे वाटत असताना अखेरच्या क्षणी सर्व्हेच्या आधारावर उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे दुभंगलेल्या कार्यकर्त्यांना आता पक्षाच्या छताखाली आणण्याचे काम खुद्द उन्मेष पाटील यांना करावे लागणार आहे. वडिलांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र राठोड यांनी विषय समिती सभापती निवडीवेळी आपली नाराजी दाखवून दिली आहे. मात्र, डॅमेज कंट्रोलच्या आधारे त्यांची समजूत काढण्यात आली. नंतर आपण पक्षासाठीच काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.