आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुलपाखरांचे उद्यान होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - उंचडोंगर, दाट हिरवळ, नीरव शांतता आणि धबधब्यासोबतच आता अनेक प्रजातींची दुर्मीळ फुलपाखरेही लळिंग कुरणात अगदी जवळून पाहता येणार आहेत. त्यासाठी विशेष असे फुलपाखरांचे उद्यान अस्तित्वात येत आहे. एवढेच नव्हे तर डोंगरखो-यात वसलेल्या आदिवासी बांधवांच्या गावाचा अनुभव व्हावा म्हणून वारली चित्रकारी रेखाटलेली छोटी घरेही साकारण्यात आली आहेत. वन विभागाच्या नियमांच्या अधीन राहून पर्यटकांना या सौंदर्याचा मनमुराद आनंद घेता येऊ शकणार आहे.

धुळे शहरापासून सुमारे कि.मी. अंतरावर असलेले लळिंगचे कुरण सुमारे चार हजार २०० हेक्टर क्षेत्रात विस्तारले आहे. या कुरणात आजही अनेक वन्यप्राण्यांना पाहता येते. शिवाय अन्वर नाल्याचा धबधबा कोणाचेही लक्ष विचलित केल्याशिवाय राहत नाही. नैसर्गिक संपदेने परिपूर्ण असलेल्या लळिंग कुरणाला सुमारे सव्वा वर्षापूर्वी वनक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. या ठिकाणी आता पर्यटन विकासाची कामे सुरू आहेत. लळिंग कुरणाच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला आता बटरफ्लाय गार्डन तयार केले जात आहे. विविध प्रजातींची फुलपाखरे आकृष्ट व्हावीत यासाठी या उद्यानात केवळ फुलांची रोपे, लता-वेली लावण्यात येणार आहे. रानटी फुलांसह बाजारात मागणी असलेल्या फुलांचेही या ठिकाणी रोपण केले जाणार आहे. उद्यानात आलेल्या पर्यटकांना डोंगर-टेकड्या, हिरवळ आणि वन सहवासासोबतच अनेक प्रजातींची फुलपाखरे यामुळे पाहता यावी हा त्यामागील उद्देश आहे.

त्यामुळेच या उद्यानाला बटरफ्लाय गार्डन असे संबोधण्यात येणार आहे. पर्यटकांनी सोबत आणलेल्या वनभोजनाचा आस्वाद घेता यावा म्हणून उद्यानाजवळच काही झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. आदिवासी बाधंव, त्यांची संस्कृती वारली चित्रकलेचे जवळचे नाते असल्यामुळे या झोपड्यांवर ठिकठिकाणी वारली चित्रकारी करण्यात आली आहे. यामुळे आदिवासीबहुल गावात वास्तव्याचा पर्यटकांना अनुभव घेता येणार आहे. पर्यटकांनीही उद्यान झाल्यावर योग्य ती काळजी घेतली पाहिजे.

कारंजा, कृत्रिम धबधबा
बटरफ्लाय गार्डनच्या मधोमध गोलाकार हौद करण्यात आला आहे. या ठिकाणी सजावटीसाठी मोठे पाषाण ठेवले जात आहेत. त्यातून कृत्रिम धबधबा साकारण्यात येणार आहे. अथवा कारंजा तयार करण्याचा वन विभागाचा मानस आहे. शिवाय बागेत ठिकठिकाणी आतापासून सिमेंटचे बाक ठेवण्यात आले आहेत.

झोपडीत स्वयंपाकाची सोय
काहीहौशी पर्यटकांना वनक्षेत्रात स्वयंपाक भोजनाचा मोह आवरत नाही. त्यासाठी प्रसंगी वननियमही डावलले जातात. यावर तोडगा म्हणून या झोपड्यांमध्ये पर्यटकांना स्वयंपाक करता यावा यासाठी सोय करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पर्यटकांना मात्र कोणत्याही हरित संपत्तीची हानी करता येणार नाही. शिवाय त्यासाठी नियमावलीही ठरवण्याचा वन विभागाचा मानस आहे. अथवा पर्यटकांना वनभोजन देण्याची जबाबदारी बचत गटाकडे सोपवण्याचाही विचार सुरू आहे.

सद्य:स्थितीतील कामे पाहता दिवाळीपर्यंत विकासकामे पूर्णत्वास येऊ शकतील. वरिष्ठ अधिकारी या कामाकडे प्रत्यक्षात लक्ष ठेवून आहेत. फुलपाखरांचे उद्यान पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र ठरेल. डी.यू. पाटील. उपवनसंरक्षक अधिकारी