जळगाव - शहरातील बहुसंख्य हाॅटेलचालकांनी हाॅटेलच्या जागेत अतिक्रमण केल्याच्या तक्रारी वाढल्या अाहेत. अशा अतिक्रमणांचा शाेध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अादेशाने महापालिका महसूलचे संयुक्त पथक तयार करण्यात येणार अाहे. साेमवारपासून शहरातील हाॅटेलच्या बांधकामांची पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती अायुक्त जीवन साेनवणे यांनी दिली.
रामानंदनगरात एका बिअरबार चालकाने सामासिक अंतरात परमिट रूमच्या शेडचे बांधकाम करून ते बंदिस्त केले हाेते. या बाबत नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे यांनी पालिकेकडे तक्रार करून बिअरबारवर कारवाई करण्यासाठी नागरिकांची स्वाक्षरी माेहीम राबवली हाेती. बेंडाळे यांच्या तक्रारीनंतर पालिकेने अंतिम नाेटीस देऊन अतिक्रमण काढण्याची सूचना केली हाेती. दरम्यान, शुक्रवारी नगररचना विभागाचे समीर बाेराेले अतिक्रमण अधीक्षक एच. एम. खान यांच्या नेतृत्वात पथकाने कारवाई सुरू केली. त्या वादग्रस्त बिअरबारचे २० बाय १० अाकाराच्या शेडचे बांधकाम काढण्यात अाले. दरम्यान, बिअरबारमालक रवींद्र जगताप यांनी तक्रारदारांविरुद्ध संताप व्यक्त करत माझे एकट्याचे अतिक्रमण काढतात, मग इतरांचे का नाही? असा प्रश्न उपस्थित केला प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
कारवाई संदर्भात बिअरबारमालक जगताप यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली हाेती. त्यानंतर जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी शुक्रवारी महापालिका अायुक्तांना पत्र देऊन परिसरातील सर्वच अतिक्रमणांवर कारवाई का नाही? अशी विचारणा करत कारवाईचे अादेश दिले हाेते. त्यानुसार पालिकेने रामानंदनगर परिसरातील प्राथमिक १८ अतिक्रमणांची यादी तयार केली अाहे. नगररचना विभागाकडून त्या अतिक्रमणांची माेजणी करून संबंधितांना नाेटीस बजावण्यात येणार अाहे.
तहसीलदारांनी घेतली तातडीने भेट
जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र दुपारी प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार अमाेल निकम यांनी सायंकाळी अायुक्त जीवन साेनवणे यांची भेट घेतली. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील अनधिकृतपणे जागेचा वापर करणाऱ्या हाॅटेल्सची पाहणी करण्याचे अादेश दिल्याचे सांगितले. तसेच महापालिका महसूल विभागाने संयुक्तरीत्या ही माेहीम राबवावी, अशी सूचना केल्याचे अायुक्तांना सांगितले. त्यानुसार पालिका शहरातील सर्वच बांधकामांच्या बेसमेंटची तपासणी करणार अाहे. महसूल विभाग हाॅटेलच्या बांधकामाची माहिती घेऊन अनधिकृत वापर हाेत असल्यास एनए नुसार दंड अाकारेल, तर मनपा दुप्पट दंडाची अाकारणी करून जागेला सील लावणार असल्याचे अायुक्त साेनवणेंनी सांगितले.