आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माढ्यात पाण्यासाठी शेतकऱ्यांच्या स्वाभिमानी आंदोलनाला सुरुवात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माढा- सीना माढा उपसा जलसिंचन योजनेचे पाणी टेल टू हेड पद्धतीने देण्यात यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांसमवेत माढा तहसीलसमोर शुक्रवारपासून बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे. 

टेल टू हेड पद्धतीने पाणी सोडल्याने शेतकऱ्यांची पिके करपून जाऊ लागली आहे. या योजनेचे पाणी हे टेल टू हेड पद्धतीने दिले जात नसल्याने तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. या अगोदरही बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील घाटणेकर यांनी या मागणीसाठी माढा तहसीलसमोर एक दिवसीय उपोषण केले होते. पाणीप्रश्नी आता स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते रिंगणात उतरले आहेत. 

या प्रश्नांविषयीचे गांभीर्य लोकप्रतिनिधी प्रशासनाला नसल्याचा आरोप करीत जोपर्यंत या योजनेचे टेल टू हेड पद्धतीने पाणी वितरण केले जात नाही तोपर्यंत उपोषणावरून उठणार नसल्याचा पवित्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे. तहसीलदार सदाशिव पडदुणे यांनी या उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेऊन म्हणणे जाणून घेऊन उजनीचे अधीक्षक अभियंता शिवाजी चौगुले यांना याची माहिती कळवली.
 
जलसिंचन योजनेचे पाणी माढ्यातील मनकर्णा नदी, नांदकबुवा तळे, जाधववाडी, शिंदेवाडी, रणदिवेवाडी आदींसह अन्य भागातही पोहोचले नसल्याने या भागातील शेतकऱ्यांची पिके जळून जात आहेत. या योजनेचे 1994 मध्ये माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते भूमिपूजन केले होते. 23 वर्षे लोटूनदेखील 50 टक्के योजनेचे काम रखडलेल्या स्थितीतच आहे. आंदोलनात स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पाटील, सिद्धेश्वर घुगे, महावीर सावळे, संभाजी काटे, तानाजी लोंढे, भीमराव भांगे, शिवाजी लोंढे, मगन सावंत, गणेश सावंत, बाळासाहेब लेंडवे, नागनाथ कदम, बळीराम यादव, मोहन राऊत, पंडित साळुंखे, अतुल यादव, भारत राऊत यांच्यासह अन्य शेतकरी उपोषणात सामील झाले आहेत. तातडीने याबाबत निर्णय झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
तालुक्याच्या उजनी (मा) गावच्या अकुंभे शिवेकडील भाग पाण्यासाठी आजही आक्रोश करत अाहे. शेतकऱ्यांची पिके जळून चालली आहेत. अकुंभे भागातील लोकांनी कालव्यालगतच विहिरी भरून घेतल्या आहेत. असा स्पष्ट विरोधाभास दिसतो. त्यामुळे हा दुटप्पीपणा बाजूला करून प्रशासनाने टेल टू हेड पद्धतीने पाणी वंचित गावांना द्यावे अन्यथा याहून अधिक उग्र आंदोलन छेडले जाईल.
- शिवाजीपाटील, जिल्हा उपाध्यक्ष, स्वाभिमानी 
 
शेतकरी संघटना 
सीना माढाउपसा जलसिंचन योजनेत 36 गावे समाविष्ट असून यापैकी 20 गावे अजूनही पाण्यापासून वंचित आहेत. अपूर्ण अवस्थेतील सुरू असलेल्या या योजनेचा लाभ आजवर मोजक्याच गावांना होत आला आहे.
- सिद्धेश्वर घुगे, लऊळ शेतकरी 

सीना माढाउपसा जलसिंचन योजनेचे पाणी माढ्यापर्यंत यायला वेळ लागणार आहे. आमचे अधिकारी आंदोलकांशी चर्चा करून मार्ग काढतील.
- एस. पी. सोनेवार, उपविभागीय अभियंता उजनी लाभक्षेत्र 
बातम्या आणखी आहेत...