आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तर बेलगंगाप्रश्नी उसाची होळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव - सहा वर्षांपासून बंद असलेल्या बेलगंगा सहकारी साखर कारखान्याचा विषय जिल्हा बँकेने कुठल्याही मासिक सभेत स्थानिक संचालक प्रदीप देशमुख यांच्या दबावाखाली घेतला नाही. येत्या 16 मार्चपर्यंत कारखान्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय न घेतल्यास देशमुख यांच्या घरासमोर होळीच्या दिवशीच उसाची होळी करू, असा इशारा बेलगंगा पुनर्वसन समितीचे अध्यक्ष उन्मेष पाटील यांनी कारखाना साइटवर आयोजित निर्धार मेळाव्यात दिला. कारखान्यासाठीची लढाई वर्षभरापूर्वीच सुरू केली होती, याची आठवण उन्मेष पाटील यांनी करून दिली. आता निवडणुका जवळ आल्याने त्यांना कारखाना आठवलाय, असा टोला त्यांनी लगावला.

कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कै.जिभाऊ उर्फ रामराव पाटील यांची पुण्यतिथी व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कारखाना साईटवर 19 रोजी सकाळी निर्धार मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश सोनवणे होते.

व्यासपीठावर माजी आमदार अ‍ॅड. ईश्वर जाधव, पंचायत समितीचे सदस्य संभाजी पाटील, पालिकेचे विरोधी पक्षनेते राजेंद्र चौधरी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आर.के.पाटील, नगरसेवक संजय घोडेस्वार, प्रभाकर चौधरी, विवेक चौधरी, ऊस उत्पादक शेतकरी अरुण पाटील, डिगंबर देवरे, खेर्डेचे माजी सरपंच धनराज पाटील आदी उपस्थित होते. स्व.जिभाऊ पाटील यांचा पुतळा व शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून मेळाव्याचे उद्घाटन झाले.

उन्मेष पाटील म्हणाले की, आमची लढाई कोणत्याही व्यक्ती विरुद्ध नसून प्रवृत्ती विरुद्ध आहे. शासनाने आजारी साखर कारखाने विक्रीवर बंदी आणली असून अनेक कारखाने दीर्घ मुदतीच्या भाडेपट्टय़ाने सुरू झाले आहेत.

कारखाना सुरू करण्यासाठी सर्व पर्याय जिल्हा बँकेसमोर होते. मात्र स्थानिक संचालक प्रदीप देशमुख यांच्या दबावाखाली बँकेने कारखाना सुरू करण्यासाठी कोणताच ठोस निर्णय घेतला नाही.

आजच्या वर्षभरापूर्वी आम्ही कारखाना सुरू करण्यासाठी अभियान सुरू केले होते. यासाठी पदयात्रा काढली, न्यायालयाचे दरवाजे ठोठावले, जिल्हा बँकेत शेतकरी घेऊन गेलो मात्र तरीदेखील याची दखल घ्यावीशी वाटली नाही. त्यामुळे तालुक्याचा ऊस उत्पादक शेतकरी व्याकूळ झाला आहे. 16 मार्चपर्यंत कारखान्यासंदर्भात निर्णय न झाल्यास त्या दिवसाच्या होळी सणाला स्थानिक संचालकांच्या दाराशी उसाची होळी करू , असा इशारा त्यांनी दिला.

जिल्हा बँकेला थेट सात प्रश्न
निर्धार मेळाव्यात जळगाव जिल्हा सहकारी बँक व स्थानिक संचालकांना सात प्रश्न विचारण्यात आले. आजतागायत कारखान्याचा विषय बँकेच्या मासिक सभेत का ठेवला नाही?, स्थानिक संचालकांनी कारखाना सुरू करण्यासाठी काय प्रयत्न केले, कारखान्याचा विषय मासिक सभेत येऊ नये म्हणून कोणाचा दबाव होता, आम्ही कारखाना सुरू करण्यासाठी सुचविलेल्या उपायांबाबत कुठलाही निर्णय का घेतला नाही, असे प्रश्न या निर्धार मेळाव्या प्रसंगी विचारण्यात आले.

शेतकर्‍यांना सोबत घेणार
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आर.के.पाटील, सुरेश सोनवणे, माजी सरपंच धनराज पाटील यांनी आंदोलनात शेतकर्‍यांना सोबत घेणार असल्याचे सांगितले. कारखाना सुरू झालाच पाहिजे. यासाठी राजकारण बाजूला सारून फक्त शेतकर्‍यांचा विचार करावा, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

दुर्लक्षित पुतळय़ाची रंगरंगोटी
कारखाना साइटवर कारखान्याचे संस्थापक स्व.जिभाऊ पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा असून तो दुर्लक्षित झाला होता. अवतीभवती काटेरी झुडपे वाढून पुतळय़ावर धूळ बसली होती. उन्मेष पाटील मित्र मंडळातर्फे पुतळा परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले. पुतळय़ाला रंगरंगोटी करण्यात आली. यामुळे समाधान व्यक्त केले.

आंदोलनाला भाजपाची साथ
नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते राजेंद्र चौधरी व प्रा.संजय घोडेस्वार यांनी कारखाना सुरू करण्यासाठी स्थानिक राजकारण आडवे येत असल्याचे सांगून भारतीय जनता पक्षाची ताकद कारखाना पुनर्वसन समितीच्या आंदोलनाला लावणार असल्याची ग्वाही दिली. शेतकर्‍यांशी अधिक संबंधित असलेल्या या विषयावर महत्त्वपूर्ण निर्णय होणे अपेक्षित आहे.

कामगारांच्या मुलाचे मनोगत
कारखान्यातील कामगाराचा मुलगा अ‍ॅड.रणजित पाटील म्हणाले की, कारखाना बंद झाल्याने कामगारांच्या घरातील चूल विझलेली डोळय़ाने बघितले आहे. कामगार व त्यांचे कुटुंबीय देशोधडीला लागले असून लवकरात लवकर कारखाना सुरू करावा, असे ते म्हणाले.