धुळे- धुळे पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सुरेखा देवरे यांना सुमारे नऊ हजारांची लाच घेताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रात्री ताब्यात घेतले. ही कारवाई रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कारवाई करण्याचे काम सुरू होते. रात्री उशिरा कारवाई करण्याची ही पहिलीच घटना आहे.
या विषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने दिलेल्या माहितीनुसार, पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सुरेखा देवरे यांनी हजेरी पुस्तकात नोंद करण्यासाठी एका शिक्षिकेकडे पैशांची मागणी केली होती. तडजोडीअंती श्रीमती देवरे यांनी भरत नगरातील निवासस्थानी पैसे आणून द्यावे असे सांगितले. याबाबत संबंधित शिक्षिकेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार देवरे यांच्या निवासस्थानाजवळ पथकाने सापळा लावला. ठरलेल्या वेळेनुसार संबंधित शिक्षिका सुमारे नऊ हजार रुपयांची लाच देण्यासाठी आल्या. या वेळी पथकाने गटशिक्षणाधिकारी श्रीमती देवरे यांना ताब्यात घेतले. हजेरी पुस्तकात नोंद करून दाखला देण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती, अशी माहिती पथकाने दिली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. त्यामुळे अधिक माहिती स्पष्ट होऊ शकली नाही. तथापि या घटनेला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अधिकृत दुजोरा दिला आहे. तर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू होती.
इतर २६ जणांचे काय?
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार सुमारे २७ शिक्षकांची हजेरी पुस्तिकेत नोंद करण्यात आली नव्हती. त्यापैकी तक्रारदारांनी पथकाशी संपर्क साधून तक्रार दिली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
प्रथमच घटना
अधिकाऱ्यांच्यानिवासस्थानी रात्री उशिरा धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रथमच कारवाई केली आहे. शासकीय कार्यालय सार्वजनिक ठिकाणाएेवजी थेट निवासस्थानी ही कारवाई झाल्याची ही पहिलीच घटना आहे, असा दावा पथकाने केला आहे.
मुख्यालयाची मदत
धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे महिला कर्मचारी नाही. दुसरीकडे आलेली तक्रार महिला अधिकाऱ्याविरुद्ध असल्यामुळे पथकासमोर प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिस मुख्यालयाकडे मदत मागण्यात आली. त्यानंतर मुख्यालयातून महिला कर्मचारी आल्यानंतर कारवाई केली.