आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांना मारहाण, ग्रामपंचायत सदस्याला पळवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुक्ताईनगर - कायद्याला वेशीवर टांगून भरदिवसा सराईत गुन्हेगारांसारख्या सिनेस्टाइल अपहरणनाट्याचा थरार मुक्ताईनगरातील पिंप्रीपंचम येथील नागरिकांना शनिवारी अनुभवास आला. पोलिसांना मारहाण, दगडफेक करून चक्क ग्रामपंचायत कार्यालयासमोरूनच नवनिर्वाचित सदस्याला पळवण्यात आले. सरपंच, उपसरपंच निवडीवरून निर्माण झालेल्या या वादाने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शनिवारी तालुक्यातील मेळसांगवे, कर्की, पिंप्रीपंचम, शेमळदे या चार गावांत सरपंच-उपसरपंच निवडीचा कार्यक्रम होता. यापैकी पिंप्रीपंचम येथे दुपारी १.४० ते १.४५ वाजेदरम्यान ग्रामपंचायत समोरील मैदानात एमएच.२८-व्ही.४०४२ क्रमांकाची स्विफ्ट कार येऊन उभी राहिली. या गाडीवर गावातील २५ ते ३० जणांनी तुफान दगडफेक करून काचा फोडल्या. गाडीत बसलेल्या प्रकाश बाबूराव मोरे या ग्रामपंचायत सदस्याला दमदाटी करून जबरदस्तीने गाडीतून बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी बंदोबस्तावर असलेले पोलिस उपनिरीक्षक सचिन इंगळे, हवालदार संजय भोसले, विनोद पाटील, सुनील बडगुजर, उमेश महाजन आणि चार होमगार्ड अशा जणांच्या पथकाने दगडफेक करणाऱ्या जमावाचा जोरदार विरोध केला. मात्र, जमावाने उपनिरीक्षक इंगळे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनादेखील धक्काबुक्की केली. यानंतर स्विफ्टमधून आलेला ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मोरे यास मतदान करू देता पळवून नेण्यात जमावाला यश आले. या गुंडगिरीची संपूर्ण तालुक्यात चर्चा असून ग्रामस्थ दहशतीमध्ये आहेत.

हे आहेत २५ आरोपी
उपनिरीक्षकइंगळे यांच्या फिर्यादीवरून बोदवड बाजार समितीचे संचालक भगवान विश्वनाथ पाटील, रामदास भास्कर चौधरी, नीलेश रवींद्र पाटील, डिगंबर रघुनाथ चौधरी, रघुनाथ नाना पाटील, जगन्नाथ सीताराम चौधरी, रघुनाथ पाटील, चेतन पाटील, मनोहर चौधरी, स्वप्निल पाटील, रोहित चौधरी, प्रवीण चौधरी, गजानन चौधरी, राजेश उर्फ शांताराम चौधरी, कडू पाटील, विकास पाटील, निखिल चौधरी, जीवन पाटील, पवन पाटील (सर्व रा. पिंप्रीपंचम) आणि सुभाष कोळी, किशोर कोळी, सुरेश कोळी, किशोर पाटील, वासुदेव पाटील, गोपाळ पाटील (रा.धाबे) या २५ जणांवर गुन्हा दाखल झाला.

निवड प्रक्रिया पूर्ण
थेटपोलिसांना मारहाण, दगडफेकीने हिंसेचे गालबोट लागूनही पिंप्रीपंचम-धाबे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, उपसरपंच निवड प्रक्रिया मतदानाने पूर्ण करण्यात आली. बी. पी. नेटके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत प्रतिभा चौधरी सरपंच, तर गोपाळ बाविस्कर उपसरपंच झाले. या वेळी ९पैकी सात सदस्य उपस्थित होते. उर्वरित दोघांपैकी मोरे याला जमावाने पळवून नेत मतदानानंतर सोडून दिले. तर अन्य एक महिला सदस्या मतदानाला आलीच नाही.