आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाचनात मागे राहाल तर चुकीचा इतिहास माथी बसेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल - आपण वाचनात मागे राहिल्याने खरा इतिहास लपवत काही मंडळी चुकीचा इतिहास सांगून तुमची दिशाभूल करतील. छत्रपती शिवाजी महाराजांचे खंदे समर्थक व विश्वासू योद्धा हे मुस्लिम होते. त्यांच्या सहकार्याने महाराजांनी अनेक किल्ले जिंकले हा खरा इतिहास आहे, मात्र त्यांना खोटा इतिहास सांगणाऱ्यांनी त्यांना हिंदूच बनवले व तोच आपण खरा मानत आहोत. पैसा, श्रीमंती आहे; पण वाचनालय नाही अशा अवस्थेत तुम्ही अडाणी आहात हे दिसून येते. भौतिक प्रगती होत असताना विचारांची प्रगती होणेदेखील आवश्यक आहे. तसे न झाल्याने बाबासाहेब पुरंदरे सांगतील तोच इतिहास खरा आहे, असे आपण मानायला लागतो, असे मत ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले. शनिवारी सांगवी येथे पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना ते बोलत होते.

विचारांची उंची वाढवण्यासाठी साहित्य आवश्यक आहे. तुम्ही कादंबऱ्यांसह विविध पुस्तकांचे वाचन केले पाहिजे, ज्यातून इतिहासाची खरी ओळख होईल. ज्याप्रमाणे केरळ राज्यात गावोगावी तेथील राज्य शासनाच्या वतीने वाचनालये काढण्यात आली आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रातदेखील गावोगावी वाचनालये व्हावीत, अशी अपेक्षाही नेमाडे यांनी व्यक्त केली. नेमाडे सरांचे आपल्या मूळ गावाशी असलेले नाते ते सातत्याने जोपासत असतात व दरवर्षी सुट्यांमध्ये ते येथे येत असतात. शुक्रवारी ते सपत्नीक सायंकाळी गावात दाखल झाले होते. ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर प्रथमच ते त्यांच्या मूळ गावी आले होते. त्यांचे स्वागत फैजपूर विभागीय प्रांताधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, तहसीलदार विजयकुमार ढगे यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केले.
‘हिंदू’चे पुढचे भाग लवकरच...
प्रश्न :- सध्याच्या स्थितीत वाचन संस्कृती कमी होत चालली आहे का?
नेमाडे सर : - तसे काही जाणवत नाही, उलट साक्षरता वाढली आहे व त्यामुळे वाचकही वाढला आहे.

प्रश्न :- आपल्या आगामी काही साहित्याबद्दल सांगा?
नेमाडे सर : - "हिंदू'चे तीन भाग देणार आहे. यावर काम जवळपास पूर्ण झाले असून लवकरच ते वाचकांच्या भेटीला येतील.

प्रश्न :- सिमला शहरातून गावात आल्यावर काय फरक जाणवला?
नेमाडे सर :- मी सकाळी उशिरा उठणारा माणूस आहे. मात्र, येथे आल्यावर सकाळी लवकर उठावे लागते, गावात उन्हाची तीव्रता सिमल्यापेक्षा कमी जाणवते.

प्रश्न :- पूर्वी आपण सांगवी येथे साहित्य लेखनास पसंती दाखवली होती, आता का नाही ?
नेमाडे सर :- मध्यंतरी येथे लेखनाकरिता आपण पूर्ण तयारीनिशी आलो होतो. मात्र, विजेच्या त्रासदायक भारनियमनामुळे अडचणी आल्या म्हणून तेव्हापासून येथे लेखन करण्यास आलो नाही.
बातम्या आणखी आहेत...