आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातून निघताच १५ मिनिटांतच झाला भामरे कुटुंबीयांचा अपघात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा विभागात वाणिज्य शाखेतील सहायक लिलाधर मोतीराम भामरे यांच्या कुटुंबीयांचा शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता दुर्दैवी अपघात झाला. भामरे यांचे शालक सातपूर येथे राहतात. त्यांच्या घरून पहाटे ५.१५ वाजता भामरे कुटुंबीय चारचाकी गाडीने सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथे जाण्यासाठी निघाले होते. घरून निघाल्यानंतर १५ मिनिटातच त्यांच्या चारचाकीला स्कोडा कारने धडक दिली. यात भामरेंची पत्नी, मुलगी आणि मेव्हणी जागीच ठार झाल्या. भामरे कुटुंबीयांना झालेल्या अपघातामुळे विद्यापीठात येताच हळहळ व्यक्त करण्यात येत होती. 
 
भामरे हे विद्यापीठाच्या कर्मचारी निवासस्थानात राहतात. दोन दिवसांपूर्वी ते नाशिक (सातपूर)येथील शालक संदीप पाटील यांच्याकडे पत्नी सारिका, मुलगी योगिनी मुलगा नीरज यांच्यासोबत गेले होते. भामरेंचे साडू प्रकाश पाटील त्यांच्या पत्नी रेखा हे देखील गाळण (ता.पाचोरा) येथून चारचाकीने नाशिकला पोहचले होते. गुरुवारी पाटील भामरे कुटुंबीयांनी त्र्यंबकेश्वरला देवदर्शन केले. शुक्रवारी मुलगी योगिनीची कुंडली पाहण्याच्या निमित्ताने भामरे कुटुंबीयांसह पहाटे ब्राह्मणवाडे येथे जाण्यासाठी चारचाकीने निघाले हाेते. साडू प्रकाश हे चारचाकी चालवत होते. त्यांच्या शेजारी भामरे बसले होते. तर मागच्या सीटवर दोघांच्या पत्नी आणि भामरेंची मुलगी योगिनी बसलेली हाेती. घरातून निघाल्यानंतर १५ मिनिटांतच त्यांच्या चारचाकीला अपघात झाला. यात पत्नी सारिका भामरे, मुलगी योगिनी आणि मेव्हणी रेखा पाटील या तिघांचा जागीच मृत्यू झाला. भामरे यांच्या किडनी दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून ते बेशुद्ध आहेत. नाशिक येथील खासगी रुग्णालयात ते उपचार घेत आहेत. तर प्रकाश पाटील यांना किरकोळ दुखापत झाली आहे. 

उमवि कर्मचाऱ्यांची हजेरी 
भामरे हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे कर्मचारी आहेत. त्यांच्या अपघाताची बातमी शुक्रवारी सकाळी १० वाजता विद्यापीठात धडकली.त्यानंतर विद्यापीठात शोककळा पसरली. अनेक कर्मचाऱ्यांनी जळगाव येथील घरी तर काहींनी भामरे यांच्या पत्नी आणि मुलीच्या अंत्यसंस्कारासाठी मोराणे गावी धाव घेतली. 

नीरज घरी असल्यामुळे सुदैवाने बचावला 
गुरुवारी त्र्यंबकेश्वर आणि इतर ठिकाणी फिरल्यानंतर शुक्रवारी नीरजने सिन्नरला येण्यास नकार दिला. तो नाशिकलाच थांबून होता, त्यामुळे सुदैवाने तो या अपघातातून बचावला आहे. नीरज हा केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थी असून त्याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे. तर अपघातात मृत झालेली योगिनी ही त्याची थाेरली बहिण बारावीत होती. 
 
बातम्या आणखी आहेत...