आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhila Sonwane News In Marathi, Jalgaon Zilha Parishad, Divya Marathi

भिला गोटू सोनवणे यांचे आजाराने निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते भिला गोटू सोनवणे (वय 66) यांचे दीर्घ आजाराने त्यांच्या राहत्या घरी मोहाडी (ता.जळगाव) येथे शनिवारी (दि.7) दुपारी 4 वाजता निधन झाले. त्यांचा अंत्यविधी मोहाडी येथे रविवारी (दि.8) सकाळी 10 वाजता होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी जिल्हा परिषदेच्या विद्यमान महिला-बालकल्याण सभापती लीलाताई सोनवणे, दोन मुले, दोन भाऊ, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते प्रगतिशील शेतकरी प्रभाकर गोटू सोनवणे यांचे वडीलबंधू होत.

जनतेसाठी धडपडणारा नेता
मोहाडीसारख्या छोट्या खेड्यापासून राजकीय जीवनाची सुरुवात करणारे सोनवणे यांनी अल्पशिक्षित असूनही स्वकर्तृत्वाच्या जोरावर विविध पदांपर्यंत पोहोचले. सरपंच, बाजार समितीचे सभापती, जिल्हा बँकेचे संचालक, जळगाव शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, ग्रामविकास शिक्षणप्रसारक मंडळाचे संस्थापक या आणि राज्य कोळी महासंघाचे उपाध्यक्ष अशा पदांवर त्यांना आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांनी सन 2002पासून ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबवून मोहाडी गावातील सामाजिक सलोखा आजतागायत कायम ठेवला. गावाला सन 1985पासून व्यसनांपासून मुक्त ठेवण्यासह तंटामुक्ती अभियानही 30 वर्षांपासून यशस्वीपणे राबवले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या चाहत्यांची मोहाडी येथे अंत्यदर्शनासाठी रीघ लागलेली होती. दरम्यान आदीवासी वाल्मिकलव्य सेनेचे आज (रविवार) होणारी बैठक रदद करण्यात आली आहे.

झुंजार व्यक्तिमत्त्व
भिलाभाऊ झुंजार व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या स्वभावातील लढाऊ बाणा त्यांनी अनेकदा दाखवला. एक चांगला नेता जिल्ह्याने गमावला आहे. चिमणराव पाटील. आमदार, शिवसेना
मोठा लोकसंग्रह असलेला, कायम ग्रामीण जनतेच्या हितासाठी झटणारा नेता म्हणून भिलाभाऊ सदैव आठवणीत राहतील. आमदार शिरीष चौधरी, रावेर
ग्रामीण भागातून पुढे आलेले भिलाभाऊ हाडाचे कार्यकर्ते होते. जिल्हा परिषदेमध्ये त्यांचा वेगळा ठसा होता. हरिभाऊ जावळे, माजी खासदार
भिलाभाऊ स्वकर्तृत्वाने घडले. सर्वसामान्यांमध्ये मिसळणे आणि न्यायाची भूमिका घेणे, हे त्यांचे वैशिष्ट्य होते. अँड.रवींद्र पाटील, संचालक, पणन