आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीवर वर्षभर अत्याचार, पती भक्कमपणे पाठिशी उभा राहिल्याने 13 वर्षांनंतर भोंदूबाबास शिक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोंदूबाबा सुरेशसिंग राजपूत. - Divya Marathi
भोंदूबाबा सुरेशसिंग राजपूत.
जळगाव- कुटुंबीयांना धन प्राप्तीचे आमिष दाखवून त्यांच्या १८ वर्षीय मुलीवर वर्षभर अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबास बुधवारी जिल्हा सत्र न्यायालयाने महिने तुरुंगवास आणि २० हजार रुपयांचा दंड ठोठावला. हा भोंदूबाबा शहरातीलच एका राष्ट्रीयकृत बँकेत रोखपाल म्हणून काम करीत होता.
 
विशेष म्हणजे अत्याचारित तरुणीचा विवाह झाल्यानंतर पती तिच्या पाठिशी भक्कमपणे उभा राहिल्यामुळे तब्बल १३ वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर या तरुणीस न्याय मिळाला. दरम्यान, भोंदूबाबास जादूटोणा कायद्यानुसार शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तरुणीवरील अत्याचाराचा पुरेसा पुरावा नसल्याने भोंदूबाबाला अत्याचाराच्या गुन्ह्यात शिक्षा झालेली नाही. त्यामुळे अत्याचाराबद्दल शिक्षा वाढवावी, यासाठी ही तरुणी अपिलात जाणार आहे.
 
भोंदूबाबाच्या अत्याचारास बळी पडलेली ही तरुणी आणि तिचे माहेर हे शिव कॉलनीतील आहे. ही घटना सन २००३ ची असून पीडित मुलीच्या वडिलांनी रिक्षा घेण्यासाठी एका राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज घेतले होते. याच बँकेत सुरेशसिंग शिवसिंग राजपूत (सध्याचे वय ६३, रा. सेंट्रल बँक कॉलनी) हा रोखपाल म्हणून कामाला हाेता. आपल्या अंगात ‘सैलानीबाबा’चे वारं येतं, अशी बतावणी राजपूत लोकांना करीत असे. त्याला ‘सैलानीबाबा’ म्हणूनही काही लोक संबोधत असत.
 
दरम्यान, याच गोष्टीचा फायदा घेत या भोंदूने जाटू-टोण्याचा आव आणत लोकांना लुटण्याचा धंदा सुरू केला होता. यातच पीडित मुलीच्या वडिलांनी घेतलेले कर्ज फेडले जात नव्हते, व्याज वाढतच होते. बँक कर्मचारी घरी येऊन तगादा लावत होते. हीच मजबुरी हेरून भोंदू राजपूत याने २००३ साली पीडितेचे घर गाठले. माझ्याकडील साधनेने तुमचे दु:ख, दारिद्र्य दूर करून देतो, तुम्हाला लागणाऱ्या लॉटरीचे नंबर ठिकाणही दिसू लागेल, असे आमिष त्याने दिले. यासाठी सव्वावर्ष साधना करावी लागेल, असेही त्याने सांगितले होते. अडचणीत असलेल्या कुटुंबाने त्याच्यावर विश्वास ठेऊन साधनेसाठी होकार दिला. त्यानुसार हा भोंदू दर आठवड्यात गुरुवार रविवारी त्यांच्या घरी जात असे.
 
पीडित मुलीच्या आई-वडिलांना राख मिश्रीत पाणी पाजून तसेच डोळ्यात-डोळे टाकण्याचे सांगून संमोहित करत असे. त्यानंतर त्यांच्या घरातील एका खोलीत या पीडित मुलीवर अत्याचार करीत होता. असे केले नाही तर साधनेने आई-वडिलांना मारून टाकीन, अशी धमकीही त्याने दिली होती. या भीतीपोटी युवतीने कोणालाच काहीच सांगितले नाही. याचा गैरफायदा घेत भोंदू राजपूत याने वर्षभर मुलीवर अत्याचार केले. तिने कोणाकडे तक्रार करू नये म्हणून तो तरुणीवर पाळत ठेऊन असायचा.
 
मात्र, पीडित मुलीने सहा वर्षांनी त्याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात बलात्कार,फसवणूक जादूटोणा करून फसवल्याचा गुन्हा दाखल केला. या खटल्यात सरकार पक्षाने एकूण १२ साक्षीदार तपासले. यातील पीडित मुलगी,तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर, तिची आई, घरमालक, तत्कालीन तपासाधिकारी पोलिस उपनिरीक्षक शंकर सूर्यवंशी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. बुधवारी जिल्हा सत्र न्यायाधीश (१) के.बी.अग्रवाल यांनी भोंदू राजपूतबाबास भादंवि कलम ५०८ ( जादूटोणा ) ४१७ ( आमिष दाखवून फसवणूक ) मध्ये दोषी धरले. या दोन्ही कलमांतर्गत त्याला प्रत्येकी महिने कारावास ४० हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावण्यात आली. सरकारपक्षातर्फे अॅड.केतन ढाके यांनी काम पाहिले. तर बलात्काराच्या कलमांतर्गत पुराव्यांअभावी त्याला निर्दाेष ठरवले.
 
आधीच शिक्षा भोगल्यामुळे राजपूत घरी
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी राजपूतला अटक केली होती. काही दिवस पोलिस कोठडीत राहिल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. दरम्यान, त्याने सहा महिने कारागृहात काढल्यानंतर त्याला जामीन मंजूर झाला होता. आता खटला संपल्यानंतर त्याला सहा महिन्यांची शिक्षा झाली अाहे. परंतु त्याने आधी कारागृहात काढलेला काळ शिक्षेत गृहीत धरल्यामुळे बुधवारी सहा महिन्यांची शिक्षा ठोठावल्यानंतरही तो घरी परतला.
 
पुढील स्‍लाइडवर...पती भक्कमपणे पाठिशी उभा राहिल्यानेच तरुणीस न्याय..
 
बातम्या आणखी आहेत...