आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दत्तक मुलीच्या नावावरील ठेवही बीएचआरने हडपली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या अपहार प्रकरणात शनिवारी संस्थापक संचालक प्रमोद रायसोनींसह १२ संचालकांना नांदेड पोलिसांनी जळगाव कारागृहातून ताब्यात घेतले. नांदेड येथील शिक्षकाने दत्तक घेतलेल्या मुलीच्या नावावर असलेल्या ठेवीचा अपहार केल्याचा गुन्हा शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल आहे.

नांदेड येथील शिवाजीनगर भागात राहणारे विठ्ठल संभाजी गुट्टे (वय ६२) हे त्यांच्या पत्नी सुनीता यांच्यासह राहतात. गुट्टे हे निवृत्त शिक्षक आहेत. त्यांना मूलबाळ नसल्यामुळे त्यांनी नीलिमा या अनाथ मुलीला दत्तक घेतले आहे. नीलिमाला दत्तक घेतल्यानंतर तिचे शिक्षण पुढील भविष्यासाठी गुट्टे यांनी सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांतून नीलिमाच्या नावावर २० जानेवारी २०१४ रोजी लाख रुपये ठेवले होते. तसेच पत्नी सुनीता यांच्या नावावरही एक लाख असे एकूण दोन लाख रुपये नांदेड येथील बीएचआरच्या शाखेत एफडी करून ठेवले होते.

दरम्यान, बीएचआरच्या पुणे शाखेतील अपहारानंतर गुट्टे यांनी एफडी मोडून पैसे परत घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांना रक्कम परत मिळाली नव्हती. अनेक चकरा मारून रक्कम मिळत नसल्यामुळे अखेर त्यांनी यासंदर्भात नांदेड येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या तपासासाठी शनिवारी पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार यांच्या पथकाने रायसोनी यांना जळगावातून ताब्यात घेतले आहे. रविवारी त्यांना नांदेड न्यायालयात हजर करण्यात येण्याची शक्यता आहे.

जळगावातही फरफट
गुट्टेयांना नांदेडमधील शाखेतून रक्कम मिळत नसल्यामुळे त्यांनी जळगाव येथील मुख्य शाखेतही धाव घेतली. मात्र, त्यांची येथेही फरफट झाली होती. पैसे परत मिळण्यासाठी थोडे दिवस थांबा, असे उत्तर त्यांना प्रत्येकवेळी मिळत होते. त्यामुळे हताश झाल्याने त्यांनी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला.