आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएचआरमध्ये पोलिसांसमोरच वाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेविरोधात मंगळवारी ठेवीदार, कर्जदार समन्वय समितीचे सदस्य आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी संस्थेच्या एमआयडीसीतील मुख्य शाखेवर मोर्चा काढला होता. या वेळी ठेवी परत मागण्यावरून ठेवीदार आणि संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी यांच्यात वाद झाले. संस्थेचे अध्यक्ष प्रमोद रायसोनी यांनी तत्काळ ठेवी परत करण्यास नकार दिला. या वेळी ठेवीदारांनी रायसोनी यांच्याकडे असलेले कर्ज भरण्याची मागणी केली. मात्र, त्यांनी स्वत:वर कोणतेही कर्ज नसल्याचे सांगितले. दरम्यान, ठेवीदारांनी गोंधळ घालत रायसोनींना घेराव घालून खुर्च्या मारून फेकल्या.

संस्थेच्या अधिका-यांना बोलावले बाहेर
ठेवीदार, कर्जदार समन्वय समितीच्या सदस्यांनी संस्थाध्यक्षांनी बाहेर येऊन उत्तर देण्याची मागणी केली. त्यानंतर संस्थेचे महाव्यवस्थापक सुकलाल माळी, नितेश पोतदार आणि श्रेयस नलावडे यांनी ठेवीदारांशी चर्चा केली. या वेळी संघटनेचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांनी त्यांच्याकडील कर्ज भरतो असे सांगितले. मात्र, संस्थेचे अध्यक्ष प्रमोद रायसोनी, पत्नी आणि मुलगी यांच्या नावावरील 15 कोटींचे कर्ज भरावे असे सांगितले. तसेच मंगळवारी सायंकाळपर्यंत उपस्थित ठेवीदारांना ठेवी परत करण्याची मागणी केली. त्या वेळी चर्चेनंतर माळी यांनी पोस्टडेटेड चेक देण्याचे मान्य केले. मात्र त्यांनी वादानंतर हे अमान्य केले.

शिष्टमंडळ अध्यक्षांच्या भेटीला
बीएचआर संस्थेबाहेर तीन तास आंदोलन, चर्चा केल्यानंतर ठेवीदारांचे शिष्टमंडळ हे अध्यक्ष प्रमोद रायसोनी यांना भेटण्यासाठी गेले. या वेळी रायसोनी यांना ठेवीदारांनी ठेवी कधी परत करणार? असा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी मात्र आता तत्काळ ठेवी परत देऊ शकणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ठेवीदार संतप्त झाले. कारण त्यांच्या पदाधिका-यांनी त्यांना बाहेर चेक देण्याचे आश्वासन दिले होते. या वेळी रायसोनी आणि ठेवीदारांमध्ये वाद झाले. रायसोनी यांना घेराव घालून खुर्च्यां मारून फेकल्या. त्यामुळे पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. शेवटी रायसोनी निघून गेले. मात्र, सायंकाळी 5 वाजेला संस्थाचालकांनी उपविधी घटना, संचालक मंडळाची यादी आणि ठेवीच्या रकमा लवकरात लवकर परत करण्याचे लेखी आश्वासन दिले.

ठेवी परत करण्यासाठी तीन पद्धती
सर्व शाखा सुरळीत सुरू केल्यानंतर 3 ते 6 महिन्यात सर्व मुदत पूर्ण झालेल्या ठेवी परत करण्यात येतील. शाखा सुरू होऊ शकल्या नाही तर एखाद्या बॅँकेकडून 500 कोटींचे कर्ज घेण्यात येईल. त्यानंतरदेखील समस्या सुटली नाही तर, कर्ज वसुली करून तसेच ज्या मालमत्ता तारण आहेत त्यांचा लिलाव करून ठेवी परत करणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रमोद रायसोनी यांनी स्पष्ट केले. या वेळी संघटनेतर्फे अध्यक्ष विवेक ठाकरे, मनसेचे चंदन कोल्हे, दिलीप सुरवाडे, जितेंद्र करोसिया, अनिल मराठे आदी उपस्थित होते.

माझ्यावर एक रुपयाचे कर्ज नाही
माझ्यावर संस्थेचे कोणतेही कर्ज नाही. कुणी दाखवले तर मी माझी मालमत्ता संस्थेच्या नावे करून देण्यास तयार आहे. लवकरात लवकर ठेवी परत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यासाठी ठेवीदारांनी आम्हाला सहकार्य केले पाहिजे. प्रमोद रायसोनी, अध्यक्ष, बीएचआर

रायसोनी हेच मोठे कर्जदार
संस्थेचे अध्यक्ष प्रमोद रायसोनी यांच्या पत्नी आणि मुलीच्या नावाने 15 कोटींचे कर्ज आहे. त्यामुळे तेच मोठे कर्जदार आहेत. त्यांनी अगोदर कर्ज भरावे. पुढील नियोजनासाठी 6 जूनला ठेवीदारांची पुन्हा गांधी उद्यानात बैठक घेणार आहोत. विवेक ठाकरे, अध्यक्ष, ठेवीदार, कर्जदार
समन्वय समिती मुदत पूर्ण होऊनही ठेवी मिळेना
माझ्या 5 लाखांच्या ठेवी आहेत. मुदत पूर्ण होऊनही त्या मिळत नाही. संस्थेच्या शाखा अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे आता आमचा संस्थेवर विश्वास राहिलेला नाही. वाल्मीक पाटील, ठेवीदार, चाळीसगाव

पतीच्या उपचारासाठी पैसे नाहीत
पतसंस्थेच्या शाखेत अनेक फे-या मारल्या. मात्र, समाधानकारक उत्तर मिळत नाही. माझ्या पतीची बायपास सर्जरी झाली आहे. त्यांच्या औषधोपचारासाठी पैशांची गरज आहे.
सुशीलाबाई बडगुजर, ठेवीदार, गणपतीनगर