आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरपालिकेनेच केले रस्त्यावर अतिक्रमण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - जामनेर रोडवरील पांडुरंग टॉकीजच्या अलीकडून सतारा पुलाकडे जाणार्‍या मार्गाची रुंदी 15 मीटर असल्याचे रस्ते विकास आराखड्यात दर्शविण्यात आले आहे. मात्र, पालिकेनेच या मार्गावर सार्वजनिक शौचालय उभारल्याने या रस्त्याची रुंदी प्रत्यक्षात केवळ सात मीटरच झाली आहे. त्यामुळे पालिकेनेच रस्त्यावर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले आहे. यासंदर्भात स्थानिक रहिवाशांनी शौचालयाच्या दुर्गंधीमुळे होणार्‍या त्रासापासून सुटका करण्याची विनंती विभागीय आयुक्तांसह मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडेही केली आहे. मात्र, अपेक्षेप्रमाणे त्याकडे लक्ष देण्यात आलेले नाही.

जामनेररोड आणि दगडी पुलास जोडणार्‍या एकेरी असलेल्या मार्गावर पालिकेने सुलभ शौचालय उभारले आहे. या शौचालयाच्या सेफ्टी टँकमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच शौचालयालगतच्या भागातही वाळू, विटा विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे शहर विकास आराखड्यानुसार तब्बल 15 मीटर रुंदी असलेल्या या रस्त्याची रुंदी केवळ सात मीटर उरली आहे. या रस्त्यावर सहा आसनी ऑटोरिक्षा, टॅक्सी, टाटा मॅजीक या वाहनांची कायम पार्किंग असते.परिणामी अरुं द रस्त्यावर सदैव वाहतुकीची कोंडी होते. यामुळे परिसरातील रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी तक्रार केल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी भेट देत जागेची पाहणी केली होती. यानंतर रस्त्याचे डिमार्केशन स्केच तयार करण्यात आले. त्या नकाशात दर्शविल्याप्रमाणे रस्त्याच्या मध्यभागी सार्वजनिक शौचालय असल्याचे नमूद केले आहे. शौचालयात पाण्याची टाकी नसल्याने परिसरात कायम दुर्गंधीचे वातावरण असते. तसेच सेफ्टी टँकवर झाकण नसल्याने परिसरात अनारोग्याची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच उघड्या टाक्यांमुळे डासांचा उपद्रवही वाढला आहे. रस्त्यावर अतिक्रमण झाले असल्याची तक्रार करण्यात आली आहे. मात्र, वरिष्ठ अधिकार्‍यांनी या अतिक्रमणाबाबत पालिकेचाच अहवाल मागविला. त्यामुळे सत्यता उघडकीस आलीच नाही. पालिकेने याप्रकरणी आपली बाजू सावरणाराच अहवाल दिल्याने हे प्रकरण थंड बस्त्यात जाऊ पाहत आहे.
फलक असणे गरजेचे - जामनेर रोडवरून सतारा पुलाकडील मार्गावर एकेरी वाहतूक होते, असे पालिकेचे म्हणणे आहे. मात्र मार्गाच्या दोन्ही बाजूला त्या संदर्भात फलक लावण्यात आलेले नाहीत. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू आहे. आधीच अरुंद रस्त्यावर होणारी वाहतुकीच्या कोंडीची समस्या कायम असताना सार्वजनिक शौचालयाची नवी समस्या उदयाला आली आहे.
रुंदीकरण नाही - टाऊन प्लॅनिंगच्या टोपोशिटवर 15 मीटर रंदीचा रस्ता असतानाही प्रत्यक्षात 7 मीटर रुंदीचा रस्ता अस्तित्वात आहे. पालिकेनेच मार्गावर सार्वजनिक शौचालय उभारल्याने अतिक्रमणाला वाव मिळत आहे. या मार्गाचे गेल्या 25 वर्षांत कधीही रुंदीकरण झालेले नाही. दिवसेंदिवस वाहतुकीची कोंडी वाढत असताना पालिका मात्र या अतिक्रमणाला मज्जाव करत नसल्याची स्थिती आहे.
प्रदूषणात झाली वाढ - अरुंद असलेल्या या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढून वाहतुकीची कोंडी होते. वाहनांमधून निघणार्‍या कार्बन मोनॉक्साईड व घातक कार्बन डॉयऑक्साईड वायुमूळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशोक शिरनामे, भास्कर दुसाने, निर्मला फालक, सुरेश सौंदाणे, टी. के. वारुळकर, प्रवीण महाजन, शोभा सोनवणे या नागरिकांनी या संदर्भात तक्रारही केली आहे.
एकेरी वाहतुकीचे फलक लावावे
- अरुंद रस्त्यावरील पार्किंग इतरत्र हलवावी
- विकास आराखड्यानुसार रस्ता रुंदीकरण करावा
- सार्वजनिक शौचालयाचे अतिक्रमण इतरत्र हलवावे
कागदी घोडे नाचविले जाताहेत - पालिका प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय आणि शासकीय यंत्रणेकडून तक्रारीबाबत केवळ कागदी घोडे नाचविण्यात आले आहेत. विकास आराखड्यात असलेला 15 मीटर रुंदीचा रस्ता गेला कोठे? याचा शोध पालिकेनेच घेणे आवश्यक आहे. रस्त्यावर अतिक्रमण होत असतानाही पालिका याकडे दुर्लक्ष का करते, ही बाब न समजण्यासारखी आहे. अशोक शिरनामे, तक्रारकर्ता, भुसावळ