आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप जिल्हाध्यक्षपदी रावल, चुरस वाढल्यामुळे प्रदेश पातळीवर झाला निर्णय

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - भारतीय जनता पक्षाच्या धुळे जिल्हाध्यक्ष पदासाठी 15 उमेदवार इच्छुक होते. स्थानिक पातळीवर निर्णय होऊ न शकल्यामुळे वरिष्ठ पातळीवर जिल्हाध्यक्ष निवडीचा निर्णय घेण्यात आला. वरिष्ठ पातळीवरून निर्णय जाहीर होताच शहरातील भाजप कार्यालयात फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.

भाजपतर्फे जिल्ह्यातील संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम या महिन्यात जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार चार पैकी शिंदखेडा वगळता इतर तीन तालुकाध्यक्षांची निवड झाली. गेल्या रविवारी र्शीराम वाणी मंगल कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सुनील बढे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्ष पदासाठी निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला. त्यात 16 उमेदवारांनी अध्यक्षपदासाठी आपला दावा केला होता. त्यापैकी एकाने माघार घेतली. अन्य उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी बैठकीत चार तास चर्चा करून उमेदवारांची समजूत घालण्यात आली. तरीही कोणीच माघार घेतली नाही. त्यामुळे जिल्हाध्यक्ष निवडीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सुनील बढे यांनी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार जिल्हा कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार जयकुमार रावल यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले. या वेळी इच्छुक 15 उमेदवारांसह ज्येष्ठ नेते लखन भतवाल, महापौर मंजुळा गावित, हिरामण गवळी, संजय शर्मा, संजय बोरसे, मावळते अध्यक्ष बबन चौधरी, तुषार सराफ, कामराज निकम, नारायण पाटील, सुभाष माळी, ओंकार जाधव, किरण चौधरी आदींसह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. निवडीच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. या वेळी आमदार जयकुमार रावल यांचा सत्कार करण्यात आला.

जिल्हा भाजपमय करणार
पक्षाकडे खासदार, आमदार, महापौर, पंचायत समिती सभापती असे विविध पदे असल्याने आजही जिल्ह्यात पक्ष प्रथम क्रमांकावर आहे. आगामी काळात होणार्‍या सर्व निवडणुकांमध्ये पक्ष कसा नंबर वन बनेल यासाठी आपला प्रयत्न असणार आहे. आपल्या अध्यक्षपदाच्या काळात भाजपला जळगाव जिल्ह्याच्या धर्तीवर पक्ष संघटन करून त्यात वाढ केली जाईल. जिल्हा भाजपमय करू. आमदार जयकुमार रावल, नूतन भाजप जिल्हाध्यक्ष