आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ पालिकेचे अग्निशमन वाहन धूळ खात, अग्निसुरक्षा सप्ताहातच गंभीर स्थिती चव्हाट्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहरातील पालिका मालकीच्या अग्निशमन विभागातील तीन वाहनांपैकी एक अद्ययावत वाहन केवळ सहा हजार रुपयांच्या किरकोळ दुरुस्तीचे काम होत नसल्याने धूळ खात पडून आहे. सध्या देशभरात अग्निशमन सुरक्षा सप्ताह सुरू आहे. मात्र, यादरम्यान पालिकेची ही गंभीर बाब चव्हाट्यावर आली असून लाख ८७ हजार लोकसंख्येच्या शहरासाठी सध्या नगरपालिकेकडे केवळ एकच अग्निशमन वाहन उपलब्ध आहे.

पालिकेच्या अग्निशमन विभागात तीन अग्निशमन वाहने आहेत. यातील एक वाहन पालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात विवाह समारंभ आणि इतर टंचाई असलेल्या भागांमध्ये पाणीपुरवठ्याच्या कामी जुंपलेले आहे, तर एक वाहन अत्यावश्यक सेवा म्हणून जलशुद्धीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. तसेच तिसरे वाहन इंजीनमध्ये किरकोळ स्वरुपाचा बिघाड असल्याने गेल्या तीन महिन्यांपासून नादुरुस्त आहे. यामुळे सध्या केवळ एकच वाहन आग विझवण्याच्या कामात आणले जाते.
हे वाहनही काही नगरसेवक आपल्या पदाचा गैरवापर करून विवाह समारंभात किंवा बांधकामाला पाणीपुरवठ्यासाठी घेऊन जातात. यादरम्यान, दुर्दैवाने कोठे आग लागली, तर शहरातील अग्निशमन विभागाकडे यंत्रणाच उपलब्ध नसते. इंजीनमध्ये बिघाड झालेल्या वाहनाची तज्ज्ञ गॅरेज कारागिराकडून पाहणी करण्यात आली. या दुरुस्तीसाठी किमान सहा हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

मात्र, पालिका प्रशासनाकडून हा खर्च करण्यासाठीही नाक मुरडले गेल्याने ही दुरुस्ती रखडली आहे. देशभरात सध्या अग्निशमन सुरक्षा सप्ताह सुरू आहे. या सप्ताहात अग्निशमन सेवेचे अद्ययावतीकरण केले जाते. इमर्जन्सी म्हणून काही साहित्यांची खरेदी करून अग्निशमन यंत्रणा अधिक संपन्न करण्यासाठी प्रयत्न असतो. शहरात मात्र नेमकी याउलट स्थिती निर्माण झाली आहे.

आनंद नगर परिसरात अद्ययावत अग्निशमन स्थानकासाठी निधी मंजूर झाला होता. मात्र, हा निधी कुठे गेला? याची चौकशी व्हावी. रेल्वे, आयुध निर्माणी, दीपनगर केंद्र अशी महत्त्वाची केंद्र असतानाही अग्निशमन सेवा सक्षम नाही. अॅड.कैलास लोखंडे, आनंदनगर

मुख्याधिकाऱ्यांकडे बंद अग्निशमन वाहनाच्या दुरुस्तीची मागणी केली. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केले. ते सुटीवर असल्याने दुरुस्ती कधी होणार, याबाबत शंका आहे. प्रशासन रटाळ असल्याने अत्यावश्यक सेवांवर परिणाम होतो. अख्तर पिंजारी, नगराध्यक्ष