आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुसावळात पोलिस चौक्या नावापुरत्याच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - शहरात शनिवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत पाच ठिकाणी घरफोड्या करून लाखोंचा ऐवज लंपास केला. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासनाने शहरातील नवीन वसाहत भागात पोलिस चौक्यांची उभारणी केली आहे. मात्र, या पोलिस चौक्या केवळ नावापुरत्या असून या चौक्यांवर रात्री पोलिस कर्मचारी हजर राहत नसल्याने चोरट्यांचे चांगलेच फावले आहे.
शहराची विभागणी रेल्वेच्या पुलापासून दोन भागात करण्यात आली आहे. एक भाग शहर पोलिस ठाण्याच्या तर दुसरा भाग बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो. ग्रामीण भागासाठी स्वतंत्र तालुका पोलिस ठाणे आहे. गेल्या चार महिन्यांपासून शहरातील विविध भागात चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, काही नागरिक पोलिसांच्या चौकशीचा त्रास नको म्हणून चोरी झाली तरी त्याची पोलिस ठाण्यात नोंद करण्यास धजावत नाहीत.
चोरीची नोंद करण्यासाठी पोलिस ठाण्यात गेल्यास तक्रारदाराचीच उलटतपासणी केली जात असल्याचा अनुभव अनेकांना आल्याने अनेकजण तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करतात. या प्रकारामुळे चोरट्यांचे चांगलेच फावते आहे. चोरीच्या घटनांवर प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांप्रमाणे नागरिकांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे. बाहेरगावी जाताना जवळच्या पोलिस ठाण्यात सूचना देण्याचे आवाहन करूनही नागरिक या आवाहनाला दाद देत नसल्याने चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे लक्षात येते. शहरातील विविध भागात पोलिसांची रात्रीची गस्त महत्त्वाची आहे. गस्त होत नसल्याने शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहराचा वाढता विस्तार पाहता पोलिस प्रशासनातर्फे गोपाळनगर, जामनेर रोडवरील कन्या शाळेजवळील बाजारपेठ पोलिस चौकी, पालिकेजवळील सुभाष पोलिस चौकी, जाममोहल्ला, पंधरा बंगला, सात नंबर पोलिस चौकी, नाहाटा चौफुली, गांधी चौक या भागांमध्ये अनेक चौक्या निर्माण करण्यात आल्या आहेत. परंतु गोपाळनगर, पंधरा बंगला, बाजारपेठ पोलिस चौकी, सात नंबर पोलिस चौकी येथे पोलिस अनुपस्थित राहत असल्याचे चित्र आहे.
पोलिसांची संख्या कमी - सद्यस्थितीत शहरातील पोलिस कर्मचार्‍यांची संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात कमी आहे. त्यातही अनेक कर्मचारी रजेवर असल्यास अडचण निर्माण होते. बाजारपेठ पोलिस चौकीचे बांधकाम सुरू आहे. त्याचप्रमाणे रात्रीच्या गस्तीवर जास्त भर दिला जात आहे. नजीर शेख, पोलिस निरीक्षक, बाजार पेठ पोलिस ठाणे