आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhusaval St Depot Earning Effected Due To Holiday Special Railways

भुसावळ आगारावर ‘लक्ष्मी’ची अवकृपा; उत्पन्नात घट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- दिवाळी आणि भाऊबीजसाठी गावाकडे येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांसाठी भुसावळ बस आगाराने जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले होते. मात्र, प्रवाशांनी पाठ फिरवल्याने ऐन दिवाळीत लक्ष्मी कोपली. परिणामी गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा बस आगाराला चार लाखांचा फटका सहन करावा लागला.

भुसावळ परिसरातील बहुतांश नागरिक व्यवसाय, नोकरी आणि रोजगारानिमित्त पुणे, औरंगाबाद, नाशिक, मुंबई, नागपूर, बुलडाणा आदी मोठय़ा शहरांकडे गेले आहेत. दिवाळीनिमित्त यापैकी बहुतेक जण गावाकडे येतात. या मुळे रेल्वे असो वा परिवहन महामंडळाच्या बसेस गाड्यांना प्रचंड गर्दी असते. एरव्ही प्रवाशांची शोधाशोध कराव्या लागणार्‍या आगाराचा ‘गल्ला’ ओव्हर फ्लो होतो. गेल्या वर्षी दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये भुसावळ बस आगाराने पाच बसेस सुरू केल्या होत्या. या मुळे त्यांना पाच लाखांचे उत्पन्न मिळाले होते.

यावर्षी सुद्धा आगाराने पुणे भागातील चाकरमान्यांसाठी पाच जादा बसेसचे नियोजन केले होते. मात्र, प्रवाशांनी बसऐवजी रेल्वे आणि इतर खासगी प्रवाशी वाहनांना प्राधान्य दिले. या मुळे महामंडळाची केवळ एकच बस चार दिवसाच्या कालावधीत पुणे-भुसावळ मार्गावर धावली. उर्वरित चार बसेस प्रवाशांअभावी आगारातच उभ्या ठेवाव्या लागल्या. चाललेल्या एका बसच्या माध्यमातून आगाराला चार दिवसांत केवळ एक लाखाचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत चार लाखांचे उत्पन्न घटले.