आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhusawal And Kandari Grampanchayat Rain Water Harvesting

फक्त तीन हजार रुपयांत विहिरींचे पुनर्भरण, दररोज आठ हजार लिटर पाण्याचा सदुपयोग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - उन्हाळ्यात सहकारी औद्योगिक वसाहतीमधील तिन्ही विहिरींनी तळ गाठला होता. याचा फटका तब्बल 10 कारखान्यांना बसला. भविष्यातील हा त्रास टाळण्यासाठी वसाहत प्रशासनाने, यंदा पावसाच्या वाया जाणार्‍या पाण्याचा विहीर जलपुनर्भरणासाठी वापर सुरू केला आहे.

महामार्ग सहाला लागून कंडारी शिवारात औद्योगिक वसाहतीमध्ये 80 पैकी 60 कारखाने सुरू आहेत. शेकडो मजुरांचा उदरनिर्वाह येथील या कारखानदारीवर चालतो. या कारखान्यांना वसाहतीच्या प्रशासकीय कार्यालयातील तीन विहिरींमधून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पाच वर्षांपासून या विहिरींची जलपातळी घटली आहे. गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे त्या कोरड्याठाक झाल्या. परिणामी विहिरींवर अवलंबून असणार्‍या कारखानदारांना पाण्यासाठी कसरत करावी लागली.

यावर उपाय म्हणून संस्थेने परिसरात कुपनलिका तयार केली. मात्र, पाणीपातळी खालावल्याने कुपनलिकेने मार्च महिन्यातच तळ गाठला. यामुळे तब्बल 10 कारखानदारांना खासगी टँकरचा आधार घ्यावा लागला होता. सुदैवाने यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे. यामुळे वाया जाणार्‍या पाण्याचा वसाहतीने विहीर जलपुनर्भरणासाठी वापर सुरू केला आहे. यासाठी संस्थेने मे महिन्यात केवळ तीन हजार रूपये खर्च करून ‘रेन वॉटर हॉर्वेस्टिंग’ यंत्रणा बसवली आहे.

वृक्षारोपण करणार
रेनवॉटर हॉर्वेस्टिंगमुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईवर मात करता येईल. सुवर्णमहोत्सवी वर्षात अधिकाधिक समस्या सोडवण्यावर संस्थेचा भर आहे. आठवडाभरात वृक्षारोपण करणार आहोत. खुशाल पाटील, सचिव, सहकारी औद्योगिक वसाहत

टंचाईच्या झळा कमी होणार
पावसाच्या वाया जाणार्‍या पाण्याचा जलपुनर्भरणासाठी वापर व्हावा, यामुळे भविष्यात औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार नाही. शांताबाई झोपे, गजानन आइस फॅक्टरी

समस्येवर काढला मार्ग
उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागले होते. ही समस्या मार्गी लावण्यासाठी जलपुनर्भरण प्रकल्प राबवण्यात आला आहे. मात्र, ग्रामपंचायत करांची वसुली नियमित करूनही मुलभूत सेवासुविधा पुरवित नाही. लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे अपेक्षित आहे. ज्ञानेश्वर सोनवणे, देवेंद्र आर्यन, भुसावळ

टंचाईचे संकट टळले, कुपनलिकेच्या पाणीपातळीतही वाढ

उद्योजकांनी जलपुनर्भरण प्रक्रियेला व्यापक स्वरूप दिले तर पुढील उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट उद्भवणार नाही.

पुनर्भरण प्रक्रियेमुळे जलपातळी वाढलेल्या या विहिरीत केरकचरा पडू नये, यासाठी लोखंडी जाळी बसवण्याची नितांत गरज आहे.

पाच हजार लिटर पाणी विहिरीत
छतावरील पावसाचे वाहून जाणारे पाणी पाइपाद्वारे विहिरीत सोडले आहे. पाऊस सुरू असल्यास दिवसभरात सुमारे पाच हजार लिटर पाणी थेट विहिरीत जाते. यामुळे बाजूलाच असलेल्या कुपनलिकेची पाणीपातळी वाढली आहे.

आइस फॅक्टरीचा मिळतो आधार
संस्थेच्या विहिरीलगतच गजानन आइस फॅक्टरी आहे. बर्फनिर्मितीनंतर या कारखान्यातील वाया जाणारे सुमारे तीन हजार लिटर पाणी विहीर पुनर्भरणासाठी वापरले जाते.

कंडारी ग्रामपंचायतीचे झाले दुर्लक्ष
कंडारी ग्रामपंचायत हद्दीत असलेली वसाहत दरवर्षी किमान आठ लाख रुपये वार्षिक कर भरते. मात्र, ग्रामपंचायतीकडून वसाहतीमध्ये कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नाहीत. त्यामुळे उद्योगांना अडचणींचा सामना करावा लागतो.

संस्थेचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष
21 फेब्रुवारी 1964 मध्ये सुरू करण्यात आलेल्या संस्थेचे मार्च 2013 पासून रौप्य महोत्सवी वर्ष सुरू आहे. यामुळे संस्थेने वर्षभरात वसाहतींच्या हितासाठी विविध उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.