आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ भाजप शहराध्यक्ष निवडीची उत्कंठा पोहोचली शिगेला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- भुसावळ शहर भाजपच्या अध्यक्ष निवडीसाठी बुधवारी संतोषीमाता सभागृहात एक बैठक घेण्यात आली होती. त्यात अध्यक्षपदासाठी दहा इच्छुकांपैकी कैलास शेलोडे यांनी माघार घेतल्याने नऊ जण अखेरपर्यंत शर्यतीत होते. एका नावावर शिक्कामोर्तब न होऊ शकल्याने अध्यक्षपदासाठी नियुक्त केलेल्या निवडणूक अधिकार्‍यांनी निवड जाहीर करण्याचा अंतिम निर्णय जिल्हा कोअर कमेटीकडे सोपविला आहे. त्यामुळे आता येथील शहराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते? याची उत्सुकता स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना लागून आहे.

शहराध्यक्ष निवडीचा निर्णय लोकशाही पद्धतीने जाहीर होईल, अशी अपेक्षा स्थानिक कार्यकर्त्यांना होती. मात्र, तसे न होता पक्षर्शेष्ठी लादतील तो अध्यक्ष येथील कार्यकर्त्यांना मान्य करावा लागणार आहे. पक्षातर्फे राबविण्यात येणार्‍या कार्यक्रमांत नेहमी सक्रीय व तळागाळातील नागरिकांच्या कामांना प्राधान्य देणार्‍या युवा कार्यकर्त्यालाच शहराध्यक्षपदाचे काम करण्याची संधी मिळावी, असा अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सूर आहे. शहराध्यक्षांची निवड जिल्हास्तरावरूनच जाहीर करायची होती तर मग इच्छुकांना या बैठकीत बोलावून विचारणा करण्याचीच काय गरज होती? असा परखड सवाल पालिकेतील नामनिर्देशित सदस्य वसंत पाटील यांनी या बैठकीत उपस्थित करून सर्वांनाच अंतर्मुख केले होते. इच्छुकांपैकी कोणीच कोणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाकर पवार हे सुद्धा अवाक् झाले होते. ऐवढेच नव्हे तर त्यांनी येथील शहराध्यक्ष निवडीचा चेंडू जिल्हा कोअर कमेटीकडे सोपविला आहे. त्यामुळे आता परीक्षित बर्‍हाटे, अजय पाटील, अनिल रामचंद्र चौधरी नंदकिशोर बर्‍हाटे, वसंत पाटील, प्रवीण इखणकर, राजू खरारे, अँड.प्रकाश पाटील, सुनील अग्रवाल यांच्यापैकी शहराध्यक्षपदी कोणाची निवड होते, याकडे स्थानिक कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. कोअर कमेटीकडे ज्या नऊ जणांची नावे पाठविण्यात आली आहेत. त्यातील प्रत्येकाला आपली वर्णी लागण्याची आशा लागून आहे.

मतदानाची होती गरज
शहराध्यक्ष निवडीसाठी स्थानिक पातळीवर इच्छुकांचे एकमत झाले नाही. म्हणून आता जिल्हा कोअर कमेटी जाहीर करेल तो निर्णय मान्य करावा लागणार आहे. वास्तविक पाहता पुन्हा विशेष बैठक बोलावून त्यात लोकशाही मार्गाने मतदान घेऊन अध्यक्ष निवड जाहीर करता येणे शक्य होते, असा स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सूर आहे.
-लक्ष्मण सोयंके, माजी शहराध्यक्ष, भाजप


निर्णयाकडे लक्ष
शहराध्यक्षपदासाठी नऊ इच्छुकांपैक कोणीच माघार घ्यायला तयार झाले नाही. त्यामुळे निवड जाहीर करण्याचा निर्णय आता जिल्हा कोअर कमेटीकडे गेला आहे जिल्हा कोअर कमेटीचा निर्णय अंतिम असेल.
-अजय भोळे, जिल्हा सरचिटणीस, भाजप

प्रबळ दावेदार
परीक्षित बर्‍हाटे, अनिल आर. चौधरी, नंदकिशोर बर्‍हाटे, वसंत पाटील हे चौघे प्रबळ दावेदार आहेत. जिल्हा कोअर कमेटीचा निवड जाहीर करताना कस लागेल.