आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोअर कमेटीचा दे धक्का, पक्षश्रेष्ठींनी नऊ इच्छुकांसह प्रबळ दावेदारांच्या तोंडाला पाने पुसली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - भाजपच्या शहराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या सर्वांना बुधवारी प्रचंड धक्कातंत्राचा अनुभव घ्यावा लागला. निवड प्रक्रियेदरम्यान कुठेही उल्लेख नसलेल्या रमण भोळे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली तर अनिल रामचंद्र चौधरी यांची सरचिटणीसपदी वर्णी लागली.

भुसावळ भाजप शहराध्यक्षपदासाठी परीक्षित बर्‍हाटे, अजय पाटील, नंदकिशोर बर्‍हाटे, प्रवीण इखणकर, अनिल आर. चौधरी, अँड.प्रकाश पाटील, सुनील अग्रवाल, कैलास शेलोडे, वसंत पाटील अशी इच्छुकांची भली मोठी यादी होती. निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाकर पवार यांच्या उपस्थितीत 16 जानेवारी रोजी बैठक झाली. मात्र, इच्छुक 10 जणांपैकी फक्त कैलास शेलोडे यांनी माघार घेतली. उर्वरित 9 जणांचे अर्ज कायम राहिल्याने बिनविरोध निवडीचा विषय लटकला होता. जिल्ह्यातील इतर ठिकाणी निवड प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना भुसावळ शहरात मात्र पद एक उमेदवार मात्र नऊ अशी स्थिती होती. यामुळे शहराध्यक्ष निवडीचा विषय जिल्हापातळीवर सोपवण्यात आला होता.
नव्यानेच जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारलेले उदय वाघ यांनी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, प्रदेश सहसंघटन मंत्री डॉ.राजेंद्र फडके, खासदार हरिभाऊ जावळे, खासदार ए.टी.पाटील, आमदार गिरीश महाजन, जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे आदी पदाधिकार्‍यांसोबत चर्चा केली. या चर्चेअंती भुसावळ शहराध्यक्ष पदासाठी नगरसेवक रमण भोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरचिटणीसपदी अनिल चौधरी यांना संधी देण्यात आली आहे. शहराध्यक्षपदासाठी रमण भोळे यांनी अर्ज भरला नव्हता. कोअर कमिटीकडे गेलेल्या नावांमध्ये त्यांचा उल्लेख नव्हता. तरीही अचानक त्यांची झालेली नियुक्ती कार्यकर्त्यांना आश्चर्याचा धक्का देऊन गेली. भविष्यात होणारी विधानसभा, लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन पक्षर्शेष्ठींनी अनपेक्षित निर्णय घेतला असावा, असा सूर जाणकारांनी वर्तविला आहे.

पक्षसंघटन मजबूत व्हावे
प्रदीर्घ राजकीय अनुभव, भविष्यात होणार्‍या विधानसभा, लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पक्षर्शेष्ठींनी रमण भोळे यांना संधी दिली आहे. संघटन मजबूत होण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांशी ते निश्चित समन्वय साधतील. लक्ष्मण सोयंके, माजी शहराध्यक्ष, भारतीय जनता पक्ष

कृतिशील कार्यक्रम राबवू
पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी कार्यकत्यरांशी थेट संपर्क साधण्यासाठी कृतिशील कार्यक्रम राबविण्यावर भर राहील. पक्षर्शेष्ठींनी आपल्या खांद्यावर जी जबाबदारी दिली आहे, त्याचे भान ठेऊन चिकाटीने काम करू. अनिल चौधरी, शहर सरचिटणीस, भारतीय जनता पक्ष

आता सुचनेनुसार काम करणार
अधिकाधिक लोकांना पक्षासोबत जोडण्यासाठी वरिष्ठांच्या सूचनेनुसार काम करू. जिल्हा पदाधिकार्‍यांनी शहराध्यक्षपदासाठी इच्छुक नऊ जणांसोबत संपर्क-चर्चा करून सर्वानुमते एक नाव देण्याचा पायंडा कायम ठेवला. या माध्यमातून संधी मिळाली, असे वाटते. शहरातील पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी कृतिशील कार्यक्रम राबविण्यावर भर देण्यात येईल. रमण भोळे, नवनियुक्त शहराध्यक्ष, भारतीय जनता पक्ष

पक्षर्शेष्ठींचा निर्णय शिरसावंद्य
भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदासाठी नऊ जण इच्छुक होते. त्यापैकी एका नावावर एकमत न झाल्याने हा निर्णय जिल्हा कोअर कमेटीकडे गेला होता. आता कमेटी व पक्षर्शेष्ठींनी शहराध्यक्षपदी रमण भोळे यांना संधी दिली आहे. पक्षर्शेष्ठींचा निर्णय आपल्यासाठी शिरसावंद्य आहे. नवनियुक्त शहराध्यक्षांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा प्रयत्न राहील. शहरातील पक्षसंघटन मजबूत झाले पाहिजे, हेच आपले ध्येय आहे. भविष्यात पक्षाकडून जी जबाबदारी आपल्या खांद्यावर सोपविण्यात येईल, ती पार पाडू. परीक्षित बर्‍हाटे, शहराध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा