आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मशानभूमीतील पथदिवे बंद; भुसावळात शेवटचा प्रवासही यातनामय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- शहरातील विविध समस्यांचा उद्रेक आता थेट स्मशानभूमीपर्यंत पोहोचला आहे. या मुळे शहरवासीयांना जगणे तर सोडाच, मरणे सुद्धा यातनामय झाले, असे म्हणावे लागत आहे. एकमेव स्मशानभूमीत पथदिव्यांची व्यवस्था नाही. या मुळे रात्री अंत्यसंस्कार करताना चारचाकी वाहने उभी करून त्यांच्या हेडलाइटच्या प्रकाशाचा आसरा घेण्याची वेळ मृताच्या नातेवाइकांवर आली आहे.
पालिकेने शहरात पथदिव्यांची सोय केली आहे. मात्र, बिल न भरल्याने वर्षभरात दोन वेळा वीज वितरण कंपनीने दिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला. अजूनही शहरातील बहुतांश विस्तारित भागांमध्ये पथदिवे कार्यान्वित नाहीत. आता तर शहरातील तापी काठावरील स्मशानभूमीतील पथदिव्यांचा प्रo्न ऐरणीवर आला आहे. पालिकेने मध्यंतरी स्मशानभूमीत हायमास्ट दिवा बसवला. मात्र, अपवाद वगळता हा दिवा कधीच सुरू झाला नाही. चार ते पाच मोठे खांब बसवून दिव्यांची सोय करण्यात आली. सध्या या खांबांवरील दिवेच गायब आहेत. परिणामी रात्री अंत्यसंस्कारासाठी मृतदेह आणल्यावर मृतांच्या नातेवाइकांना काळोखातच धडपड करावी लागते. प्रसंगी चारचाकी वाहनांचे हेडलाइट सुरू करून उजेड करावा लागतो. गेल्या महिन्याभरापासून हे चित्र असले तरी पालिकेने हायमास्ट आणि इतर दिवे सुरू करण्याची तसदी घेतलेली नाही. या मुळे अंत्यसंस्कारासाठी आलेले आप्तेष्ट, शहरवासी पालिकेच्या दुर्लक्षाबद्दल कमालीची हताश भावना व्यक्त करतात.
रात्रीतून होते लाकडांची चोरी
पालिकेने अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकडे पुरवण्याचा प्रयत्न केला होता. संबंधित ठेकेदाराने स्मशानभूमीच्या जागेवर लाकडांचा साठादेखील केला. मात्र, रात्रीतून लाकूड चोरी जाण्याचे प्रमाण वाढले. शिवाय पालिकेने ठेकेदाराचे बिल दिले नाही. आता हा ठेका घेण्यासाठी कोणीही इच्छुक नाही. या मुळे अंत्यविधीसाठी सात मण लाकडे विकत घ्यावी लागतात.
तत्काळ दुरुस्ती करणार
काही टारगट स्मशानभूमीतील पथदिव्यांवर दगड मारून ते फोडतात. सध्या पथदिव्यांच्या दुरुस्तीची निविदा प्राप्त झाली असून अल्पावधीतच हा प्रo्न सुटेल. तत्पूर्वी, वीज विभागाला ट्यूब आणि हॅलोजन दिवे लावण्याच्या सूचना देऊ.
-पी. जी. सोनवणे, प्रभारी मुख्याधिकारी, भुसावळ
‘दिवा’स्वप्न
पालिकेने स्मशानभूमी अत्याधुनिकीकरणाचे दिवास्वप्न दाखवले होते. यासाठी अमळनेर येथील एका एजन्सीने पाहणी केली होती. नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी यासंदर्भात पाठपुरावादेखील केला. यानंतर मात्र माशी शिंकली. या आराखड्यात उत्तरकार्य हॉल, आसन व्यवस्था, दिवाबत्ती आदी सुविधांवर भर होता.