आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळकरांची झोप उडाली; वीजपुरवठा ठप्प

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे शहरात वीज वितरण कंपनीची दाणादाण उडाली. साकेगाव फीडर वगळता सर्वच भागातील वीजपुरवठा ठप्प झाल्याने भुसावळकरांनी सोमवार आणि मंगळवारची रात्र अक्षरश: जागून काढली. बुधवारीसुद्धा विजेचा लपंडाव सुरूच होता.

सोमवारी मध्यरात्री आणि मंगळवारी रात्री शहरात पावसाच्या सरी कोसळल्या. वादळ नसले तरी मध्यम स्वरूपाच्या पावसाने वीज वितरण कंपनीला क्लिनबोल्ड केले. सोमवारी रात्री अचानक वीज गेल्याने अध्र्यापेक्षा जास्त शहर अंधारात होते. मंगळवारी दिवसभर आणि रात्रीसुद्धा सुरळीत वीजपुरवठा झाला नाही. बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास शहरातील चोरवड फीडरवरून वीजपुरवठा होणार्‍या लाइनवर अचानक झाडाची फांदी कोसळली. यामुळे सुरभीनगर, जामनेररोड, सिंधी कॉलनी, विठ्ठल मंदिर वॉर्ड, शनिमंदिर वॉर्ड आदी भागांतील वीज गेली. तब्बल आठ तासांनी अर्थात सकाळी 11.30 वाजता वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले. साकेगाव फीडरवरील शांतीनगर एबी स्वीचजवळ जंपर कट झाल्याने शांतीनगर, तापीनगर, सहकारनगर, गजानन महाराजनगर, शारदानगर आदी भागांतील वीजपुरवठा खंडित झाला तर काही भागात कमी दाबाने वीज मिळाली. शॉर्ट सर्किट झाल्याने वीजपुरवठा ठप्प झाल्याच्या तक्रारी वाढल्या. सलग दोन दिवसांपासून हा गुंता निर्माण झाला होता.


संपर्क होणे महाकठीण
वीजपुरवठा खंडित होताच वीज वितरण कंपनी कार्यालयाचे फोन खणखणतात. मात्र, ग्राहकांच्या समस्या जाणून त्यांना दिलासा देण्याऐवजी काही कर्मचारी थेट फोन बंद करतात. यामुळे वीजपुरवठा कधी सुरळीत होईल? या प्रश्‍नाचे उत्तर ग्राहकांना मिळत नाही. कार्यालयात विचारण्यासाठी गेल्यास कर्मचारी उपलब्ध नसतात. मंगळवारी रात्री सुरभीनगरवासीयांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे तयार झाली होती.


132 केव्हीची दुरुस्ती
सोमवारी रात्री एकच्या दरम्यान दीपनगर येथील 132 बाय 11 केव्हीचा ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाला. यामुळे रात्रीपासूनच 11 केव्ही वर्कशॉप, 11 केव्ही फुलगाव, 11 केव्ही आयुध निर्माण आणि भुसावळ टाऊन हे चार फीडर अंधारात होते. भुसावळ टाऊन फीडरमध्ये येणारा शिवाजीनगर, खडकारोड पाटील मळा, गांधीनगर, रामदासवाडी, मिल्लतनगर, नसरवानजी फाईल, रजा चौक, मोहम्मदीनगर, अमरदीप चौक परिसर, ग्रीन पार्कच्या काही भागातील वीजपुरवठा बंद होता.

दुसरा पर्याय नाहीच
दीपनगरच्या मुख्य केंद्रातीलच ट्रान्सफॉर्मर बंद पडल्यास दुसरीकडून वीजपुरवठा घेणे शक्यच नाही. यामुळे बुधवारी दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत वाट पहावी लागली. ऑइल फिल्टरेशनसाठी चार ते पाच तासांच्या कालवधीनंतर सकाळी 11.30 वाजेनंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. भुसावळ सिटी टाऊन फीडरवरील काही भाग पूर्ववत करण्यात यश आले.


तक्रार करावी कुठे?
खंडित वीजपुरवठय़ाची तक्रार करण्यासाठी गेल्यावर वीज कंपनीच्या कार्यालयात एकही कर्मचारी भेटत नाही. तक्रार कोणाकडे करावी? असा प्रश्‍न पडतो. दूरध्वनी बंद करून बाजूला ठेवला जातो. वरिष्ठ अधिकारी सुटीवर आहे. ड्युटी संपल्याची अजब उत्तरे देतात. महेंद्र महाजन, सुरभीनगर

समस्या सोडवणार
वीज वितरण कंपनीचे कर्मचारी चांगली सेवा देण्यास बांधील आहोत. मात्र, पावसाळ्याच्या सुरुवातीला वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढतात. तक्रारी असल्यास ग्राहकांनी थेट उपविभागीय कार्यालयात संपर्क साधावा. सुरळीत वीजपुरवठय़ामध्ये येणार्‍या सर्व अडचणी गुरुवारपर्यंत सुटतील. यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. ए.एन.भारंबे, उपकार्यकारी अभियंता, भुसावळ