आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhusawal Contro On Dr.Ambedkar Mahaparinirvan Program

महापरिनिर्वाणदिनी अस्वच्छता; भीमसैनिकांचा दोन तास ठिय्या, नगरपालिकेसमोर झाली वाहतुकीची कोंडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - महापरिनिर्वाणदिन असूनही पालिकेसमोरील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात अस्वच्छता होती. या मुळे नाराज झालेल्या भीमसैनिकांनी पालिकेच्या ढिसाळ नियोजनाचे वाभाडे काढले. नगराध्यक्ष उमेश नेमाडे, पालकमंत्री संजय सावकारे, मुख्याधिकार्‍यांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करून रस्त्यावरच ठिय्या मांडला. मुख्याधिकार्‍यांनी माफी मागितल्यानंतर दोन तास चाललेले आंदोलन मागे घेण्यात आले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी शहरातील भीमसैनिकांनी पालिकेसमोरील पुतळ्याजवळ अभिवादनासाठी हजेरी लावली. मात्र, सकाळी 11 वाजेपर्यंत सुद्धा पुतळा परिसरात अस्वच्छता असल्याने नाराजीचा सूर उमटला. यानंतर गर्दी वाढताच मुख्याधिकार्‍यांच्या नावाने घोषणाबाजी सुरू झाली. नगराध्यक्ष, मुख्याधिकारी येत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका घेतली. कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच बैठक मारल्याने बसस्थानकाकडून वरणगाव आणि वरणगावकडून बसस्थानकाकडे जाणारी सर्व वाहने रस्त्यावरच थांबून होती. काही बसेस पांडुरंग टॉकीजमार्गे वळवण्यात आल्या.
गाडी माघारी फिरवली
आंदोलन सुरू असताना पालिकेच्या अग्निशमन दलाची गाडी पुतळा परिसराच्या सफाईसाठी आली. मात्र, आंदोलकांनी जोरदार विरोध केल्याने गाडी माघारी गेली. पालिका वारंवार दुजाभाव करीत असल्याचा आरोप अनुप खोब्रागडे यांनी पोलिस निरीक्षक सतीश देशमुख यांच्याकडे केला.
मुख्याधिकारी परतले
आंदोलनाबाबत माहिती मिळताच जळगावी बैठकीत व्यस्त असलेले मुख्याधिकारी पी.जी.सोनवणे भुसावळात आले. गैरसोयीबद्दल आंदोलकांची माफी मागितली. एवढेच नव्हे तर संबंधित कर्मचार्‍यांवर कारवाईचे आश्वासन दिले. यानंतर भीमसैनिकांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
पोलिस पथक तैनात
बाजारपेठचे पोलिस निरीक्षक सतीश देशमुख, शहराचे निरीक्षक दिलीप पगारे, वाहतूक शाखेचे सतीश जाधव, सहायक पोलिस निरीक्षक पी.बी.भोंडवे, अकबर पटेल, उपनिरीक्षक नितीन पाटील व जळगाव येथील अतिरिक्त पोलिस बंदोबस्तासाठी तैनात होते.
टायरची केली जाळपोळ
पालिकेच्या आणि मुख्याधिकारी पी.जी.सोनवणे, नगराध्यक्ष उमेश नेमाडे, पालकमंत्री संजय सावकारे यांच्याप्रमाणेच आंदोलकांनी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. काही कार्यकर्त्यांनी रास्ता रोकोच्या ठिकाणी टायर जाळून निषेध केला. या मुळे गोंधळ उडाला.
जोरदार घोषणाबाजी
डॉ.आंबेडकर पुतळा परिसरात स्वच्छता करावी, यासाठी पत्र देऊनही पालिकेने दुर्लक्ष केले, असा आरोप आंदोलकांनी केला. या ढिसाळ कारभाराचा भीमसैनिकांनी जोरदार घोषणाबाजीतून निषेध केला. यामध्ये शहरातील सत्ताधारी राष्ट्रवादीपासून ते विरोधी पक्षनेते खडसे देखील सुद्धा सुटले नाहीत.
परिसरातील दुकाने बंद
पालिकेसमोर सकाळी 11.35 वाजता आंदोलन सुरू झाले. कार्यकर्त्यांनी टायरची जाळपोळ केल्याने परिसरातील हॉटेल्स, खानावळी बंद झाल्या. काहींनी दुकानाचे अर्धे शटर बंद केले. वाहतूक बंद झाल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.