आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ - तापी नदीत हिंदू स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जाणार्यांच्या नातेवाइकांना मृत्यूची नोंद करणे सोयीचे व्हावे, यासाठी यावल नाक्यावर पालिकेने कर्मचारी नियुक्त केला होता. या कर्मचार्याच्या निवृत्तीनंतर येथे नवीन नियुक्ती झाली नाही. त्यामुळे मृत्यूची नोंद रखडली आहे. याचा गैरफायदा घेत मध्यंतरी पॅरोलवर सुटलेल्या आरोपीने खोटा मृत्यू दाखला मिळवल्याचे उघड झाले होते.
यावल नाक्यावर पालिकेचा कर्मचारी हरी लोहार मृत्यूची नोंद करीत होता. लोहार निवृत्त झाल्यानंतर नवीन कर्मचारी नेमण्यात आला. त्याला इतरत्र हलवल्याने मृत्यूची नोंद करणे बंद झाले. मृत्यू दाखल्याची आवश्यकता असलेली काही मंडळी विलंबाने नोंद करतात. मात्र, अशी नोंद करण्यासाठी येणार्या कोणत्याही व्यक्तीकडे पालिकेचे कर्मचारी खरोखरच मृत्यू झाला आहे का ? याबाबत विचारणा करतात. पुरावा म्हणून संबंधित प्रभागाच्या नगरसेवकाचा दाखला मागतात. या दाखल्याच्या आधारावरच मृत्यूची नोंद होते. मात्र, ऑगष्ट 2012 मध्ये कारागृहातून पॅरोलवर सुटलेल्या आरोपीने त्याच्या नातेवाइकांच्या मदतीने मृत्यू झाल्याची खोटी नोंद पालिकेत केली. हा दाखला कारागृहाकडे पाठवला. मात्र, बिंग फुटल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. यात खोटा दाखला देणारा पालिकेचा कर्मचारीही आरोपी आहे. दरम्यान, मृत्यूच्या नोंदीसाठी अनेकदा पालिकेत हजर असलेल्या नगरसेवकांकडून दाखला मिळवला जातो. मात्र, अजाणतेपणे हा प्रकार नगरसेवकाच्या अंगलट येण्याची शक्यता वाढली आहे.
मुख्याधिकार्यांचे दुर्लक्ष
मुख्याधिकार्यांना वारंवार सांगून सुद्धा यावल नाक्यावर कर्मचारी नियुक्ती रखडली आहे. यामुळे मृत्यूच्या नोंदी नियमितपणे होत नाहीत. कर्मचारी असल्यास त्याच्या समोरून अंत्ययात्रा गेल्याने सत्य पडताळणीची गरज नसते. युवराज लोणारी, नगरसेवक
कर्मचार्यांची वाणवा
यावल नाक्यावर यापूर्वी कर्मचारी होता. मात्र, आता पालिकेकडे पुरेसे कर्मचारी नसल्याने नाक्यावर सध्या कर्मचारी नियुक्त केलेला नाही. येणार्या अडचणी पाहता नव्याने नियुक्ती करावी लागेल. अनिल जगताप, मुख्याधिकारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.