आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणवेश घोटाळा; गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण पसार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - तालुक्यातील 29 लाख रुपयांच्या गणवेश घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी तथा गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण पसार झाल्या आहेत. पोलिसांनी जळगाव येथील त्यांच्या निवासस्थानी चौकशी केली. मात्र, त्या घरी नसल्याचे त्यांच्या पतींनी पोलिसांना सांगितले.

विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी शासनातर्फे पुरवण्यात आलेल्या कापडाची परस्पर विल्हेवाट लावून 29 लाखांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी गटविकास अधिकारी डॉ.आर.पी. तायडे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने खळबळ उडाली होती. औरंगाबाद येथील र्शद्धा महिला विकास मंडळाचा अपहारात सहभाग असल्याचा संशय फिर्यादीत व्यक्त केल्याने पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. मात्र, अपहाराचे मूळ शोधण्यासाठी पोलिसांनी गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांचा शोध पोलिसांची प्राथमिकता आहे. यासाठी शुक्रवारी सायंकाळी शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने चव्हाण यांचे जळगावातील निवासस्थान गाठून चौकशी केली. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणतीही माहिती मिळाली नाही. परिणामी पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले.

दरम्यान, अटक टाळण्यासाठी चव्हाण यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. पोलिसांची बाजू ऐकल्याशिवाय चव्हाण यांना जामीन देऊ नये, अशी न्यायालयाला विनंती करणार असल्याचे तपासाधिकारी रवींद्र मानकर यांनी सांगितले. तसेच साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. औरंगाबाद येथील र्शद्धा महिला विकास मंडळाच्या पदाधिकार्‍यांचीही चौकशी होणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली.

पदभार कोणाकडे ?
गणवेश घोटाळाप्रकरणी गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून सुरू असलेला गोंधळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर शांत झाला. चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या कार्यालयाकडे फिरकल्या नाहीत. तर त्यांचा पदभार दुसर्‍या अधिकार्‍याकडे सोपवण्याची प्रक्रिया सुरू आहे. अजून नाव जाहीर झालेले नसले तरी काटेरी मुकुट सांभाळणार कोण ? असा प्रश्न आहे.