आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपनगरच्या प्रत्यक्ष पाहणीला अधिकार्‍यांची अजूनही टाळाटाळ सुरूच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - निकृष्ट कोळसा वापरल्याने दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राच्या परिसरात गेल्या आठवड्यात राखेचा पाऊस पडला होता. यामुळे बाधित शेतीशिवाराची पाहणी करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे करण्यात आली होती. आठ दिवस उलटूनही कोणत्याही विभागाने ही पाहणी केलेली नाही. यामुळे तोंडाला पाने पुसली गेल्याची शेतकर्‍यांची भावना आहे.

दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात एफ ग्रेडचा कोळसा वापरल्याने प्रदूषणाचा उद्रेक झाला. परिसरातील शेती शिवारावर राखेचे लोट तयार झाले. वरणगाव आयुध निर्माणीपर्यंत राख पोहोचली. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने सडेतोड वृत्त प्रकाशित केल्याने जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र चौधरी यांनी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी ए.जे.कुडे यांच्याकडे पत्रव्यवहार केला. स्वत: येऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केली होती. मात्र आठ दिवस उलटूनही स्पॉट व्हिजिट करण्यात आली नाही. सातत्याने होणार्‍या प्रदूषणाबाबत कोणासही सोयरसुतक नसल्याचे यावरून पुढे येत आहे. किमान प्रदूषण नियंत्रण मंडळाने तक्रारीची दखल घेऊन कारवाई करणे अपेक्षित होते.

दरम्यान, गेल्या आठवड्यात सोमवार, मंगळवारी झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे प्रकल्पातून उडालेली राख जमिनीत जिरली. यामुळे एकप्रकारे पुरावा नष्ट होण्यास मदतच झाली आहे. तत्पूर्वी, हवेतून राखेचे उत्सर्जन होत असल्याने उडणार्‍या राखेमुळे वायुप्रदूषण झाले. पावसामुळे हीच राख जमिनीत मिसळल्याने मृदा प्रदूषणाचा प्रकार वाढला. दीपनगर केंद्राकडून वारंवार प्रदूषण होत असताना प्रदूषण नियंत्रण मंडळ बँक गॅरंटी जप्त करण्याशिवाय इतर कोणतीही कारवाई करीत नाही. यामुळे दीपनगर प्रशासनाचे फावले आहे. वीजनिर्मिती गरजेची असली तरी प्रकल्पामुळे होणारे प्रदूषण थांबावे. यासाठी प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी. प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस कृती न करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातून पुढे आली आहे.

अँक्शन प्लॅन पडला धूळखात
महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी रस्त्यावर राखेचे ढीग साठवून ठेवले आहेत. पावसापूर्वी वार्‍याचा वेग वाढल्यास ही राख रस्त्यावर उडते. दीपनगर केंद्रातील हॉपर लहान असल्याने राख उडते. उपमुख्य अभियंता एस.डी. आसमवार यांनीही भेट देऊन पाहणी केलेली नाही. प्रदूषण नियंत्रणासाठी तयार करण्यात आलेला अँक्शन प्लॅनही धूळखात पडून आहे.

अधिकार्‍यांना फासणार राख
स्पॉट व्हिजिट करण्यासाठी विनंती करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाजेनकोचे अधिकारी आणि जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी भेट दिली नाही. आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही. महाजेनकोच्या अधिकार्‍यांच्या अंगावर राख टाकण्याचे आंदोलन लवकरच हाती घेऊ. राजेंद्र चौधरी, सदस्य, जिल्हा परिषद