आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुसावळात पॉवर: रात्रीचे भारनियमन बंद होणार!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ: वीज वितरण कंपनीने महिनाभरापासून भुसावळात रात्रीचे भारनियमन सुरू केले आहे. यामुळे उद्योग-व्यावसायात मरगळ आली असून शहरातून नाराजीचा सूर उमटत आहे. याची दखल घेत आमदार संजय सावकारे यांनी थेट ऊर्जामंत्री अजित पवार आणि व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांच्याकडे पाठपुरावा केला. शहर भारनियमन मुक्त होणे गरजेचे असल्याचे पटवून दिले. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून मंगळवार (ता.5)पासून शहरातील रात्रीचे भारनियमन बंद होणार आहे. पत्रकार परिषद घेवून आमदार सावकारे यांनी ही माहिती दिली.
वीज वितरण कंपनीच्या निकषांनुसार भुसावळ विभाग पूर्वी डी झोनमध्ये होता. मात्र, बिलांची वसुली आणि विजेची चोरी या नव्या निकषांनुसार डी झोनमधून इ झोनमध्ये वर्गीकरण करण्यात आले. इ झोनच्या निकषांनुसार सकाळी तीन तास आणि सायंकाळी 7 ते 10 वाजेच्यादरम्यान तीन तास असे एकूण सहा तास भारनियमन होते. 2 मेपासून हा प्रकार सुरू असल्याने शहरात रात्री अंधार वातावरण असते. याचा फायदा घेवून घरफोड्या, चोरीच्या घटना वाढल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वीज नसल्याने बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली. सायंकाळी वीज नसल्याने अनेकांनी दुकाने बंद ठेवणे पसंत केले. रोजगारावर परिणाम झाला. गृहिणींमधूनही नाराजीचे सूर उमटायला सुरुवात झाली. एकूणच जाचक भारनियमन नागरिकांच्या असंतोषाला खतपाणी घालणारे ठरले. मध्यंतरी शहरात वीज कंपनीचे दोन कार्यालये फोडण्यात आली. हा उद्रेक थोपविण्याचे मोठेच आव्हान अधिकारी-कर्मचार्‍यांसमोर होते. दरम्यान, अन्यायकारक भारनियमन रद्द व्हावे, यासाठी फक्त ‘दिव्य मराठी’ने वारंवार आवाज उठवित भेधडक वृत्त प्रकाशित केले. या वृत्तांची दखल घेत आमदार संजय सावकारे यांनी पाठपुरावा केला. बुधवारी त्यांनी राज्याचे ऊर्जा सचिव अजय मेहता यांच्याशी सविस्तर चर्चा केली. शहरात वीज चोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वच नागरिक सहकार्य करणार असल्याचे पटवून दिले. आमदारांची ही मध्यस्थी यशस्वी ठरली. परिणामी येत्या मंगळवारपासून शहरातील रात्रीचे भारनियमन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात शुक्रवारी मुंबई येथून आदेश काढण्यात आला आहे. पत्रकार परिषदेत या सर्व मुद्दय़ांचा आमदारांनी उहापोह केला. शहर पूर्णपणे भारनियमनमुक्त व्हावे, यासाठी आपले प्रामाणिक प्रयत्न होते. मात्र, वीजचोरीचे प्रमाण जास्त असल्याने ते शक्य नाही. आता नागरिकांनीच पुढाकार घ्यावा, वितरण कंपनीच्या अधिकारी-कर्मचार्‍यांनीही चोरी रोखण्याचे जबाबदारी पेलावी, असे ते म्हणाले. तरीही गळती झाल्यास कनिष्ठ अभियंत्यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. पत्रकार परिषदेला नगरसेवक युवराज लोणारी, राजेंद्र आवटे, राजेंद्र नाटकर, उदयसिंग काके, पंचायत समितीचे उपसभापती राजेंद्र चौधरी, नगरसेवक भीमराज कोळी आदी उपस्थित होते.
मनसेचा घेराव अन् अधिकार्‍यांना घाम
शहरातील भारनियमन बंद करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शुक्रवारी प्रभारी कार्यकारी अभियंता ए. एन. भारंबे यांना घेराव घालण्यात आला. शहरात वीज बिलांच्या वसुलीचे प्रमाण अधिक आहे. वीज गळती ही वितरण कंपनीच्या बेजबाबदार अधिकार्‍यांमुळे होते, असा आरोप करीत मनसेचे जिल्हा सरचिटणीस अँड. कैलास लोखंडे, जिल्हा उपाध्यक्ष विजय भोळे आणि कार्यकर्त्यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. भारनियमन बंद करण्याचा आदेश मिळत नाही, तोपर्यंत कार्यालयातून बाहेर जाणार नाही, अशी भूमिका घेतली. यामुळे दरदरून घाम फुटलेल्या भारंबे यांनी दूरध्वनीद्वारे मुख्य अभियंता विजय सोमकुंवर आणि अधीक्षक अभियंता अरुण पापडकर यांच्याशी अँड. लोखंडे यांचे बोलणे करून दिले. त्यांनी मंगळवारपासून रात्रीचे भारनियमन बंद करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी अँड. कैलास लोखंडे, विजय भोळे, प्रवीण नेमाडे, प्रमोद सोनवणे, अँड. योगेश वाणी, गणेश चौधरी, नाना लोखंडे, सदानंद गिरी, राजू सपकाळे, गजु झांबरे, योगेश बागुल, दत्तू सोनवणे, गजानन वाघ, मंगल बाक्से आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.