आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावकारेंची मंत्रिमंडळात वर्णी;संतोष चौधरी सर्मथक चार हात राहिले लांब!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार संजय सावकारेंना राज्याच्या मंत्रिमंडळात संधी मिळाल्याने पक्षासह त्यांच्या स्थानिक; पण निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. मात्र, नगरपालिकेवर एकछत्री अंमल असलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी व अनिल चौधरी यांच्या सर्मथकांनी या जल्लोषापासून ‘चार हात’ लांब राहणेच पसंत केले. म्हणूनच हा विषय चर्चेचा ठरत आहे.

भुसावळ ही नाशिक विभागातील एकमेव ‘अ’ वर्ग नगरपालिका आहे. आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखाली या पालिकेत राष्ट्रवादीचीच सत्ता असली तरी सर्व सूत्रे ही चौधरी बंधूच कळत-नकळतपणे हलवतात, हे आता काही लपून राहिलेले नाही. भुसावळला तब्बल सहा दशकानंतर प्रथमच मंत्रिपद मिळाल्याने ‘न भूतो न भविष्यती’ असा जल्लोष होईल, असे चित्र मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत निर्माण झाले होते. मात्र, प्रत्यक्षात सावकारेंचा शपथविधी झाल्यानंतर जो आनंदोत्सव साजरा करण्यात आला, मिरवणूक काढण्यात आली. त्यात सत्ताधारी पालिकेतील नगरसेवक निर्मल कोठारी, उदयसिंग काके अशा हाताच्या बोटावर मोजता येतील एवढय़ाच नगरसेवकांनी सहभाग नोंदवला. पालिकेवर जर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व आहे तर मग अपवाद वगळता उर्वरित नगरसेवक हे आपल्या पक्षाच्या आमदाराला मंत्रिपद मिळाल्याच्या आनंदोत्सवापासून चार हात का लांब राहिले? असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष युवराज लोणारी हे मुंबईत असले तरी त्यांचे सुपुत्र गौरव लोणारी व पुतण्या कपिल लोणारी यांनी शहरात त्यांची कमतरता अजिबात जाणवू दिली नाही. ‘छत्रपती ग्रुप’ व आपल्या प्रभागातील युवा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांनी संजय सावकारेंना मंत्रिपद मिळाल्याच्या आनंदोत्सवात हिरिरीने सहभाग नोंदवला. नगरपालिकेचे माजी शिक्षण सभापती तथा विद्यमान नगरसेवक राजेंद्र आवटे हे सुद्धा सावकारेंची मंत्रिपदी वर्णी लागल्याने त्यांच्या भेटीसाठी सोमवारपासून मुंबईकडे रवाना झाले होते. मात्र, त्यांच्या कार्यकर्त्यांनीही त्यांची उणीव भासू दिली नाही. नगराध्यक्ष उमेश नेमाडे हे दुपारी दीड वाजेपर्यंत भुसावळातच होते; पण ते शहरात ठिकठिकाणी राष्ट्रवादी कॉँग्रेस व सावकारे सर्मथकांनी केलेल्या जल्लोषात कुठेच चमकले नाहीत. एवढेच नव्हे, तर युवराज लोणारी यांचे सुपुत्र गौरव लोणारी यांच्या नेतृत्वाखाली काही धाडसी कार्यकर्त्यांनी नगरपालिकेच्या आवारातच फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करून आपल्या आनंदाला वाट मोकळी करून दिली. परंतु यावेळीही येथे पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीचे नगरसेवक चमकले नाहीत. चौधरी बंधूंच्या कार्यकर्त्यांचे मोहोळ व बलस्थान समजल्या जाणार्‍या ‘एसी ग्रुप’च्या कार्यकर्त्यांनी या जल्लोषापासून लांब राहून ‘दुरून डोंगर साजरे’ या उक्तीचा प्रत्यय आणून दिला. संजय सावकारेंची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी ‘मतदारसंघासाठी आजचा क्षण हा चैतन्यदायी आहे. विविध प्रकारच्या प्रलंबित योजनांना गती मिळण्यासाठी सावकारेंच्या मंत्रिपदाचा लाभ होईल. पर्यायाने शहराचा विकास होईल’ अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे. एकीकडे ते सावकारेंकडून भविष्यात सहकार्याची अपेक्षा करतात. मात्र, दुसरीकडे त्यांना मिळालेल्या मंत्रिपदाच्या जल्लोषापासून लांब का बरे राहत असतील? असा प्रश्न उपस्थित होत असून तो चिकित्सक राजकारण्यांच्या भुवया उंचावणारा आहे. कदाचित, त्यांना पालिकेच्या सत्तेच्या चाब्या ज्यांच्या खिशात आहेत, त्या चौधरी बंधूंकडून तसा राजकीय भूमिका स्पष्ट करणारा ‘खलिता’ अद्याप प्राप्त झाला नसेल म्हणून ते सावकारेंच्या मंत्रिपदाच्या जल्लोषापासून लांब असावेत. भविष्यात पालिकेच्या विकास रथाला लागलेली मोगरी हटवायची असेल तर नेमाडेंना ‘स्पष्टवक्ता सुखी भव’ या उक्तीचा प्रत्यय आणून देण्याशिवाय गत्यंतर नाही.

लोणारींचे आता ‘वजन’ वाढणार
राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील चौधरी सर्मथक हे मनोमनी वितुष्ट निर्माण झाल्याने सावकारेंपासून दूर गेल्याचे सर्वर्शृत आहे. मात्र, युवराज लोणारी हे त्याला अपवाद आहेत. कारण ते संजय सावकारे आमदारकीला निवडून आले तेव्हापासून त्यांच्याच सोबत आहेत. आता सावकारे हे मंत्री झाल्याने लोणारींचे ‘राजकीय वजन’ वाढणार आहे. भविष्यात त्यांना या वजनाचा नगराध्यक्षपदाच्या सिंहासनावर विराजमान होण्यासाठी कितपत फायदा होतो? याचीच खरी उत्सुकता आहे.