आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडणी प्रकरणी माजी आमदार संतोष चौधरींचा निकाल 17 जुलैला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरीविरुद्ध न्यायाधीश वाय.के. देवरे यांच्यासमोर सुरू असलेल्या खटल्याचा निकाल पुन्हा पुढे ढकलण्यात आला आहे. फिर्यादी चंद्रशेखर अत्तरदे यांना प्रधान न्यायाधीश इंदिरा जैन यांनी फेटाळून लावलेल्या न्यायाधीश बदलीच्या निकालाविरोधात औरंगाबाद उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी मुदत हवी आहे. त्यांनी न्यायालयात तसा अर्ज दाखल केल्याने गुरुवारचा निकाल आता 17 जुलै रोजी जाहीर होईल.

हा खटला न्यायाधीश ए.बी. ओढावढेकर यांच्यासमोर सुरू होता. मात्र, निकाल लागण्याच्या आधीच त्यांची बदली झाली. त्यांच्या जागी आलेले न्यायाधीश देवरे यांच्यासमोर अंतिम युक्तिवाद झाला होता. गुरुवारी तेच निकाल जाहीर करणार असल्याने न्यायालय परिसरात पोलिस बंदोबस्त होता. आरोपी संतोष चौधरीला 10.30 वाजताच पोलिस व्हॅनमधून न्यायालयात आणण्यात आले होते.

संतोष चौधरींची ‘कार फेरी’ बंद; सरकारी पोलिस व्हॅनमधून कारागृह ते न्यायालयाचा प्रवास..
खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी जळगाव जिल्हा कारागृहाच्या ताब्यात असलेले आरोपी संतोष चौधरी याची पोलिस खास बडदास्त ठेवत असल्याचा ‘दिव्य मराठी’ने पर्दाफाश केल्यानंतर जागे झालेल्या कारागृह व पोलिस प्रशासनाने गुरुवारच्या तारखेसाठी पूर्ण दक्षता बाळगली. खासगी कार वापरणार्‍या चौधरींना इतर आरोपींप्रमाणेच पोलिसांच्या व्हॅनमधून न्यायालयात नेण्यात आले. खटल्याचा निकाल लांबणीवर पडल्याचे जाहीर झाल्यानंतर त्यांना पुन्हा व्हॅनमधूनच कारागृहात आणण्यात आले. दरम्यान, बडदास्तीची चौकशी सुरूच आहे.