आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरचं झालं थोडं अन् भुसावळ नगरपालिकेला व्याह्यान पाठवल घोडं

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाची भुसावळ विभागाला उत्सुकता आहे. मात्र, चौपदरीकरणाचा नाहाटा चौफुलीजवळील पालिकेच्या जलकुंभास फटका बसणार आहे. त्यातच पालिकेने नवीन जलकुंभाचा खर्च करावा, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पालिकेला कळवले होते. मात्र, पालिकेने ही सूचना फेटाळून लावत नवीन जलकुंभ उभारणीसाठी 10 कोटी रुपये खर्च येईल. पालिकेची स्थिती हलाखीची असल्याने ऐवढा खर्च शक्य नसल्याचे मंगळवारी पत्र पाठवून स्पष्ट केले.

नाहाटा चौफुलीवर पालिकेने 1983 मध्ये जलकुंभ उभारला होता. 19 लाख 67 हजार लीटर्स क्षमतेचा हा जलकुंभ आहे. या जलकुंभाला 500 मि.मी. कास्ट आयर्नची रायझिंग मेन पाइपलाइन व वितरण प्रणालीतील 600, 500 आणि 300 मि.मी. व्यासाच्या कांस्य आयर्नच्या वितरण वाहिन्या (पाइपलाइन) आहेत. नाहाटा चौफुलीवरील जलकुंभापासून ते भुसावळ शिवारातील सव्र्हे क्रमांक 12 मधील पाण्याच्या जलकुंभापर्यंत जाणारी 350 मि.मी. व्यासाची एसी प्रेशर गुरूत्ववाहिनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या दक्षिण व उत्तर दिशेला आहे.

चौपदरीकरणात पाणीपुरवठा यंत्रणेच्या स्थलांतरासाठी लागणारा निधी ‘नॅशनल हायवे’कडून उपलब्ध होईल, असे सांगितले होते. नंतर मात्र हा खर्च पालिकेनेच करावा, असे कळवण्यात आले. मात्र, आर्थिक अडचणीत असलेल्या पालिकेने ही सूचना धुडकावून लावली. त्यासाठीच पालिकेने संबंधितांसोबत पत्रव्यवहार सुरू केला आहे.

सव्वा लाख लोकसंख्या
नाहाटा चौफुलीवरील यंत्रणेवर शहरातील 1 लाख 25 हजार लोकसंख्येचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. या यंत्रणेचे स्थलांतरण पालिका आणि नॅशनल हायवे विभागाच्या समन्वयातून होणे अपेक्षित आहे. अन्यथा पाणीपुरवठय़ात अडचणी आल्यास शहरातील सव्वा लाख लोकसंख्येवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ येईल.

तब्बल 10 कोटी रुपयांची गरज
पाणीपुरवठय़ाचा जलकुंभ हटवून अन्य ठिकाणी उभारणी, नव्याने पाइपलाइन टाकण्यासाठी प्राथमिक अंदाजानुसार 10 कोटी रुपयांची गरज आहे. पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने इतका खर्च पेलवणारा नाही. याबाबत पालिकेने 24 जुलैच्या सभेत ठराव झाला होता.

पत्रव्यवहार सुरू
शहरातून गेलेल्या महामार्गाच्या चौपदरीकरणात नाहाटा चौफुलीजवळील जलकुंभ, जलवाहिन्यांचे जाळे उद्ध्वस्त होणार आहे. ही यंत्रणा इतरत्र उभारणीसाठी तब्बल 10 कोटी रुपये खर्च लागेल. पालिका एवढा खर्च करूच शकत नाही. तसे आम्ही प्रकल्प संचालकांना कळवले आहे.
-अनिल जगताप, मुख्याधिकारी, भुसावळ पालिका