आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळमध्ये रेल्वेत खाद्यपदार्थातून विषबाधा; एकाचा मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव / भुसावळ - रेल्वे प्रवासात द्राक्ष खाल्ल्याने दोन बालकांना विषबाधा झाल्याची घटना भुसावळ स्थानकावर उघडकीस आली. यात अजमत मोहमंद इरफान (वय 12, रा.पुरेनी, ता.मधेपुरा, जि.पटना, बिहार) या बालकाचा मृत्यू झाला आहे. तर सरोज कासीम सब्जीफरोज (वय 11, रा.पुरेनी) या बालकावर जळगावच्या गणपती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील जामिया मदरशात शिक्षण घेणारे बिहार राज्यातील पुरेनीचे 35 मुले सुटीनंतर शुक्रवारी सकाळी पटना- कुर्ला (गाडी क्रमांक 13201) या गाडीने अक्कलकुवा गावाकडे निघाले होते. प्रवासात या विद्यार्थ्यांनी रेल्वेत फिरत्या विक्रेत्यांकडून द्राक्ष घेऊन ती खाल्ली. यातील अजमत इरफान याला कटनी स्थानकाजवळ उलट्या झाल्या. रेल्वेच्या डॉक्टरांनी त्याला ग्लुकोज व औषधी दिली. मात्र, ही गाडी रविवारी भुसावळ स्थानकावर येताच त्याला पुन्हा उलट्या झाल्या. रेल्वे स्थानकावर उपचाराची सुविधा न मिळाल्याने त्याच्या सोबतच्या मित्रांनी त्याला गोदावरी हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, हॉस्पिटलमध्ये नेत असताना रस्त्यावरच त्याचा मृत्यू झाला, असे मदरशाच्या मौलांनी सांगितले. रेल्वे विभागाकडून वेळीच उपचार न झाल्याने हा मृत्यू ओढावल्याची तक्रारही त्यांनी केली आहे. मृत अजमतवर दुपारी मेहरूण भागात अंत्यसंस्कार करण्यात आले. अन्य विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार करून अक्कलकुवा येथे पाठविण्यात आले.

पटना-कुर्ला एक्स्प्रेसमध्ये खाद्यपदार्थातून दोन बालकांना विषबाधा झाल्याची घटना गंभीर आहे. नेमका हा प्रकार कोणत्या स्थानकावर घडला? याचीही वस्तुनिष्ठ माहिती गोळा करण्यात येत आहे. चौकशीअंती रेल्वेच्या नियमानुसार दोषींवर कारवाईचे पाऊल उचलण्यात येईल. पी.एल.वर्मा, प्रभारी मंडळ आयुक्त, रेल्वे सुरक्षा बल, भुसावळ

रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ विक्री करण्याचे परवाने वाणिज्य विभागातर्फे दिले जातात. विषबाधेचा प्रकार कोणत्या स्थानकावर घडला? याबाबत चौकशीचे काम सुरू आहे. विभागातील प्रत्येक स्थानकावरून खाद्यपदार्थ विक्रीचा अहवाल मागविला जात आहे. वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक एन.जी.बोरीकर हे रेल्वे कंट्रोल रुममध्ये बसून या प्रकरणी विभागातून माहिती संकलित करीत आहेत. बी.पी. पांडे, व्यवस्थापक, वाणिज्य मंडळ, भुसावळ