आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ शहर रॉकेल माफियांचा अड्डा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - भुसावळ शहर रॉकेल माफियांचा मोठा अड्डा झाला असून प्रशासनसुद्धा यात सामील आहे. महामार्गावर बिनबोभाट निळ्या रॉकेलची विक्री करून पाच ते सहा रॉकेल माफिया धनदांडगे झालेले आहेत. ही खदखद एखाद्या विरोधी पक्षातील पदाधिकार्‍याची नसून खुद्द सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष युवराज लोणारी यांची आहे. या माफियांवर कारवाई व्हावी, हिच पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

बाजारपेठ पोलिसांनी मंगळवारी (दि. 3) काळ्या बाजारातील रेशनचे साडेआठ हजार लीटर रॉकेल पकडले. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीच्या शहर उपाध्यक्षावर गुन्हा दाखल झाला. या मुळे शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष युवराज लोणारी यांनी बुधवारी निवेदन प्रसिद्धीस दिले. त्यात भुसावळ शहरात निळ्या रॉकेलचा अवैध साठा सापडला. चौकशीअंती यात सहभागी सर्वांवर कारवाई व्हावी. राष्ट्रवादीची बांधिलकी जनतेशी आहे. भुसावळकरांना निळे रॉकेल मिळायला हवे, हिच पक्षाची भूमिका आहे. याप्रकरणी कोणी पक्षाची बदनामी करत असेल तर सहन करणार नाही. पक्षात राहून कोणी असे कृत्य करत असेल तर निश्चितच कारवाई होईल. पाच ते सहा रॉकेल माफिया धनदांडगे झालेले आहेत. त्यांची पाळेमुळे खोदण्यासह सर्व रॉकेल डेपोचालकांची चौकशी व्हावी. यानंतर कार्यकर्ते अवैध विक्रेत्यांचे अड्डे पोलिसांच्या लक्षात आणून देतील, असा इशारा लोणारींसह युवा शहराध्यक्ष दिनेश भंगाळे, अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष पप्पू बागवान यांनी दिला आहे.

ही तर अतिशय लज्जास्पद बाब
निवेदनात लोणारींनी पोलिसांचे अभिनंदन करून तहसीलदारांच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या पुरवठा विभागाचे वाभाडे काढले आहेत. अवैध रॉकेल साठय़ाची पोलिसांना माहिती मिळते. मात्र, ज्यांची खरी जबाबदारी आहे, अशा पुरवठा खात्यास माहिती नसणे लज्जास्पद बाब असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.