आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ - जादूई विश्वात रममाण झालेले घुले यांनी इलेक्ट्रीक इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, गोवा, आंध्र प्रदेश, कर्नाटक अशा अनेक राज्यांमध्ये त्यांनी आजपर्यंत जादूचे तब्बल 3 हजार प्रयोग केले आहेत. पाकिस्तानातील सिंध प्रांतात 2005 मध्ये त्यांनी चेट्रीचंडनिमित्त दोन जादूचे प्रयोग केले आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवर जादूच्या प्रयोगांवर संशोधन करून आपल्या देशातील जादूगारांना उपलब्ध करून देण्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. तसेच त्यांनी स्वत: तयार केलेले चार प्रकारच्या जादूचे साहित्य हे कलकत्ता येथील ‘सादीक अँड कंपनी’तर्फे पॅकिंग करून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठवले जाते. जळगावातील सुमित छाजेड हे सुद्धा घुले यांचे साहित्य देश-विदेशात पाठवतात. भुसावळच्या खळवाडी भागात घुलेंचे वर्कशॉप आहे. तेथेच सहा युवक आणि अन्य सहा युवक घरी जादूच्या साहित्याची निर्मिती करतात.
केदारींकडून मिळाली प्रेरणा
भुसावळात रेल्वे विभागात नोकरीला असलेले के. एल. केदारी हे पूर्वी जादूचे प्रयोग करायचे. त्यांनी एकदा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जादूचे प्रयोग केले होते. पाचवीत असताना हे प्रयोग पाहिले. त्यातून प्रेरणा मिळाली आणि जादूचे साहित्य या विषयावरील पुस्तके वाचून लहान -मोठे साहित्य तयार करून प्रयोग सादरीकरणावर भर दिला. आता नवीन संशोधनासाठी गजानन सॉ-मिलचे नरेंद्र पटेल, क्रेझी क्रिएशन्सचे संचालक राजेश पाटील, वीरेंद्र पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. नवरात्रोत्सवात देखावे सादर करत असल्याचेही ते आवर्जून नमूद करतात.
भुसावळच्या कार्यशाळेत तयार होतेय नावीन्यपूर्ण जादूचे साहित्य
ऑटोमेटिक टॉर्च टू रोझ : अर्धा फूट इंचाची एक ची बॅटरी असते. ती जळत्या टेंभ्यासारखी दिसते. परंतु तिच्यावर जादूगाराने हात फिरवला की, गुलाबाचे फूल तयार होत असते.
वॉव कार्ड : कमीत कमी तीन ते चार इंच नेटच्या जाळीचा एक तुकडा असतो. तो दोन्ही बाजूंनी पारदर्शक दिसतो. मात्र, तो थोडासा हलवला की, त्यात रसिकांना पत्ते ठळकपणे दिसतात.
हाँग काँग बॉक्स : एक आयताकृती चौकोन असतो. तो चारही बाजूने उघडतो. जोडल्यानंतर त्यातून रिकामा ग्लास निघतो. दुसर्यांदा मात्र, याच ग्लासमध्ये दूध भरलेले दिसून येते.
फोटो फ्रेम : प्लायवूडपासून एक चौकोन बनवलेला असतो. त्याची घडी करता येते. उलटा-पालटा करून दाखवल्यावर या चौकानातून आपोआप फोटो फ्रेम रसिकांना बघायला मिळते.
बिग सुपर डाइस फ्रेम : आयताकृती एक चौकोन असतो. तो दोन्ही बाजूंनी पारदर्शक बनवण्यात आलेला आहे. मात्र, त्यात हात टाकला की, 12 चौकोनी कागदाचे ठोकळे लिलया बाहेर काढले जातात.
मॅजिकल वॉन्ट : साधारणत: दीड ते दोन फूट लांबीची ही जादूची छडी असते. काळ्या रंगाच्या कापडाचा वापर त्यासाठी केलेला असतो. जादूगाराने तिच्यावर हात फिरवला की, हा कापड छडीसारखा ताठ होतो.
फायर बुक अँड डाऊ केजेस : अभिनव अशा या कलाप्रकारात जादूगाराच्या हातातील पुस्तकाला आपोआप आग लागते. एवढेच नव्हे तर या पुस्तकातून तारेचे लहान लहान आकारातील तीन पिंजरे निघतात.
डॉट टू डाय : आंतरराष्ट्रीय पातळीवरील जादूई विश्वात हा गाजलेला कलाप्रकार आहे. एक चौकोनी आकाराचा पुठ्ठा असतो. त्यात वेगवेगळ्या रंगांचे ठिपके असतात. हात फिरवला की, ते आपोआप बदलतात.
चार प्रयोगांचे स्वत: केले संशोधन
जादूगार विश्वजित घुले यांनी ऑटोमेटिक टॉर्च टू रोझ, हॉँग कॉँग बॉक्स, फोटो फ्रेम, डायमंड कट, अशा तीन प्रकारच्या प्रयोगांचे संशोधन केले आहे. त्यांचे हे तिन्ही प्रयोगांचे साहित्य आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे.
कागदावरील चित्र करणार हालचाली
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ‘मॅन्युअली अल्टिमेट स्केच पॅड’ हे जादूचे साहित्य 25 हजार रुपयांत मिळते. मात्र, ते अतिशय महागडे असल्याने आपल्या देशातील जादूगारांना हा प्रयोग सादर करता येत नाही. म्हणून या प्रयोगाचे साहित्य भुसावळात तयार करण्याचे प्रयत्न घुले यांनी सुरू केले आहेत. जादूगाराने हातात घेतलेले चित्र आपोआप हालचाल करते, असा हा प्रयोग असल्याचे घुले यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.