आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhusawal : Mahajanco Filled 125 Crores , Flayover's Waiting

भुसावळ : महाजनकोने 125 कोटी भरले; उड्डाणपुलाच्या कामाची प्रतीक्षा चालूच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - महाजनको प्रशासनाने फुलगावजवळील रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल उभारण्यासाठी सव्वाशे कोटी रुपये भरले आहेत. मात्र, तरीही कामाला सुरुवात झालेली नाही. दुसरीकडे रेल्वे मार्गावरून लवकरच कोळसा वाहतूक सुरू होत असल्याने राष्ट्रीय महामार्गावर मेगाब्लॉक घ्यावा लागण्याची चिन्हे आहेत.

दीपनगर विस्तारित वीजनिर्मिती प्रकल्पाला कोळसा पुरवण्यासाठी वरणगाव रेल्वेस्थानकातून फुलगावमार्गे लोहमार्ग टाकण्यात आला. यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर रेल्वे फाटक तयार करावे लागले. महामार्गाच्या वाहतुकीला अडथळा नको म्हणून रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाची निर्मिती होणार आहे. यासाठी महाजनकोने 125 कोटी रुपयांचा निधी महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग केल्यावरही काम सुरू झालेले नाही. आता दीपनगरसाठी आठवड्याभरात कोळसा वाहतूक सुरू होणार असल्याने 24 तासांतून किमान सहा तास रेल्वे फाटक बंद असेल. यामुळे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीचा मेगाब्लॉक घ्यावा लागेल. उड्डाणपुलाची निर्मिती होईपर्यंत ही डोकेदुखी कायम राहणार आहे.

दीपनगरच्या वीजनिर्मिती केंद्राला दररोज 10 रॅक कोळसा लागणे अपेक्षित आहे. 58 डब्यांचा रॅक या मार्गावरून संथपणे जाताना किमान 20 मिनिटांचा कालावधी लागेल, असा अंदाज आहे. 10 रॅक जाताना आणि येताना दररोज 6 तास 40 मिनिटांचा कालावधी लागेल. यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक 24 तासांतून 6 तास 40 मिनिटे विस्कळीत होणार आहे.


लोहमार्ग चाचणी पूर्ण
दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राच्या नवीन लोहमार्गाची चाचणी पूर्ण झाली आहे. लवकरच या मार्गावरून दीपनगर केंद्राला कोळसा उपलब्ध होईल. वीजनिर्मिती वाढवण्यासाठी यामुळे मदत होणार आहे. दररोज 10 रॅक कोळसा मिळाल्यास वीजनिर्मितीचा टप्पा वाढेल. आर.व्ही.तासकर, उपमुख्य अभियंता, दीपनगर केंद्र


उड्डाणपुलासाठी अवधी
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण पाणीटंचाईमुळे रखडले आहे. सद्य:स्थितीवरून या कामासाठी पावसाळा उजाडेल. यानंतर प्रत्यक्ष उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागेल. या दीड ते दोन वर्षांदरम्यान दररोज किमान सहा तास वाहतुकीचा खोळंबा झाल्यास राष्ट्रीय महामार्गावर रहदारीची मोठी समस्या निर्माण होईल. यामुळे वाहतूक कोंडी वाढेल.