आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थकबाकीच्या चिखलात रूतला भुसावळ पालिकेचा आर्थिक गाडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- दोन वर्षांपासून शहरातील विकासकामे थांबल्याने पालिकेच्या कर वसुलीवर विपरीत परिणाम झाला आहे. नागरिकांकडून घरपट्टी, पाणीपट्टी आणि दुकान भाड्यापोटी 15 कोटी 78 लाख 17 हजार 618 रुपये वसुलीसाठी सध्या कसरत सुरू आहे. मार्च अखेरपर्यंत यातील किती रक्कम जमा होते? यावरच भविष्यातील विकासकामांचे नियोजन ठरणार आहे.
पालिकेला दरमहा कर्मचारी वेतन आणि पेन्शनसाठी अंदाजे 40 लाख रुपयांच्या रकमेची तूट भासते. लाइटबिल, पाणीपुरवठा यंत्रणेच्या वीज बिलापोटी 27 लाख रुपये लागतात. तसेच शासनाकडून घेतलेले कर्ज भरणे, कर्मचार्‍यांच्या वेतन आयोगाचा फरक, निवृत्ती फालक आणि केशवप्रसाद जोशी यांचे भूसंपादनप्रकरण, वीज कंपनीची थकबाकी, ही आर्थिक कसरत करावी लागते. हा आर्थिक गाडा हाकण्यासाठी मार्च अखेरपर्यंत पालिकेला 20 कोटी 45 लाख रुपये उभारणे गरजेचे आहे. या व्यतिरिक्त पुरवठादार आणि मक्तेदारांची बिले, सुरक्षा अनामतीसाठी 4 कोटी रुपयांची गरज आहे. या मुळे सध्या पालिकेने कर वसुलीवर भर दिला आहे. त्यासाठी वेळोवेळी करवसुली पथकाच्या बैठकाही घेण्यात येत असल्याचे चित्र आहे.

सुटीच्या दिवशी काम
पालिकेच्या वसुली विभागाची नुकतीच बैठक झाली. यात शनिवार आणि रविवारी तसेच शासकीय सुटीच्या दिवशीदेखील कामकाज सुरू ठेवण्याची हमी कर्मचार्‍यांनी दिली आहे. विभाग प्रमुखांसह संजय बाणाईते, प्रकाश कोळी, सुभाष ठाकूर आदी उपस्थित होते.
कर वसुलीसाठी सहकार्य
पालिकेला मार्च अखेरपर्यंत 24 कोटी रुपयांचे देणे आहे. तर शहरवासीयांकडे विविध करांपोटी 15 कोटी 78 हजार रुपये घेणे आहेत. पालिकेची अर्थव्यवस्था आणि दैनंदिन गरजांचा खर्च लक्षात घेता कर वसुली महत्त्वाची ठरेल.
-पी. जी. सोनवणे, प्रभारी मुख्याधिकारी