आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhusawal Muncipal Council Gets 73 Lakhs For The Road Development

भुसावळ पालिकेला रस्त्यांच्या विकासकामांसाठी 73 लाख मिळणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - सर्वसाधारण रस्ता अनुदानाचा दुसरा आणि तिसरा हप्ता राज्यातील नगरपलिका आणि महापालिकांना देण्याबाबत नगरविकास विभागाने 5 एप्रिलला अध्यादेश काढला आहे. या अंतर्गत भुसावळ पालिकेला दुसर्‍या हप्त्याचे 33 लाख 12 हजार 190 रुपये तर तिसर्‍या हप्त्याचे 40 लाख, असे एकूण 73 लाख 12 हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

राज्यातील महानगरपालिका आणि नगरपरिषदांना सन 2012-2013 या वित्तीय वर्षात रस्ता अनुदान देणे या योजनेंतर्गत 106 कोटी 96 लाख 97 हजार रुपयांचा निधी 30 मार्च 2013 च्या शासन निर्णयाने मंजूर करण्यात आला आहे. याबाबत नगर विकास विभागाने 5 एप्रिल रोजी दुसर्‍या आणि तिसर्‍या हप्त्याचे दोन वेगवेगळे अध्यादेश जारी केले आहेत. यात नाशिक विभागातील ‘अ’ वर्ग नगरपालिका असलेल्या भुसावळ शहराचाही उल्लेख आहे. दोन्ही हप्त्यांच्या अनुदानापोटी पालिकेला 73 लाख 12 हजार 190 रुपयांचा निधी मिळेल. गेल्या दहा वर्षांत शहरातील रस्त्याची पूर्णपणे डांबरीकरण झालेले नाही.

पालिका प्रशासनाकडे यापूर्वीचा 3 कोटी रुपयांचा निधी शिल्लक आहे. त्यात पुन्हा रस्ता अनुदानाची भर पडली. निधी शिल्लक असतानाही शहरातील रस्त्यांची स्थिती मात्र बकाल आहे. प्रमुख रहदारीच्या रस्त्यांसह आता गल्लीबोळातील रस्त्यांची स्थितीही बिकट आहे. यामुळे उपलब्ध निधीमधून तातडीने रस्त्यांची कामे सुरू होणे अपेक्षित आहे.


तांत्रिक मंजुरीची प्रतीक्षा
जामनेर, जळगाव, यावल आणि आरपीडीरोड पहिल्या टप्प्यात तयार करण्यात येतील. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे तांत्रिक मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. मंजुरीनंतर निविदा काढली जाईल. रस्ता अनुदानातून केवळ रस्त्यांचीच कामे केली जातील. हा निधी इतर कामांसाठी वापरला जाणार नाही. बी.टी.बाविस्कर, प्रभारी मुख्याधिकारी, भुसावळ

रस्ते मोजताय शेवटची घटका
शहरातील स्टेशनरोड, जामनेररोड, जळगाव रस्ता, आरपीडी रस्ता, खडकारोड, वरणगाव रस्ता, जळगावरोड या प्रमुख रहदारीच्या मार्गांची स्थिती अंत्यत विदारक झाली आहे. अनेक वर्षांपासून डागडुजी न झाल्याने शहरातील रस्ते शेवटीची घटका मोजत आहेत.
सात पालिकांचा समावेश
महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने काढलेल्या अध्यादेशाप्रमाणे जिल्ह्यातील भुसावळ पालिकेसह रावेर, चाळीसगाव, फैजपूर, यावल, चोपडा आणि पारोळा या सात पालिकांना अनुदान मिळेल. रावेर नगरपालिकेसाठी सर्वाधिक 80 लाख रस्ते अनुदानास मंजुरी मिळाली.


वाहने झाली खिळखिळी
खराब रस्त्यांमुळे चारचाकी आणि दुचाकी वाहने खिळखिळी झाली आहेत. स्पेअरपार्टचे नुकसान होण्यासह किरकोळ अपघात होतात. खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनचालकांना आता पाठीच्या मणक्यांचाही त्रास जाणवतो. पालिका प्रशासनाबद्दल अधूनमधून संतापाची भावना व्यक्त होताना दिसते.