आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आतल्या गोटात: पालिकेत बहुमत, सभेतील चर्चेतून मात्र काढता पाय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- भुसावळ पालिकेच्या 125 वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीत मंगळवारी दुर्दैवी इतिहास घडला. जिल्हाधिकार्‍यांनी 19 जून रोजी झालेली पालिकेची सर्वसाधारण सभा रद्द केली. उमेश नेमाडे यांच्यासारख्या सुशिक्षित आणि ‘शहराचा कळवळा’ असलेल्या व्यक्तीकडे पालिकेचे नेतृत्त्व असताना विरोधकांची (स्वकियांसह) होणारी मुस्कटदाबी शहरवासीयांच्या अपेक्षांना सुरुंग लावणारी आहे.

कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ताधारी बहुमताच्या जोरावर विरोधकांवर वरचढ ठरतात. बहुमताच्या जोरावरच ‘जनतेचे हित’ या गोंडस नावाखाली सोयीचे विषय मंजूर केले जातात, हे आता लपून राहिलेले नाही. अनेकवेळा संवेदनशील विषयांवर सभागृहात गरमागरम चर्चा होते. कधी सर्वानुमते विषयांना मंजुरी मिळते. तर कधी विरोधी बाकांवरून सत्ताधार्‍यांची कोंडी करण्यासाठी वेगवेगळी आयुधे वापरली जातात. मात्र, अटीतटीचा प्रसंग आला तर सत्ताधारी गट बहुमत, आवाजी मतदान, हात उंचावून किंवा थेट गुप्त मतदानाचा आधार घेऊन बाजी मारतात. यापैकी ‘बहुमताचा वापर’ करून अवघ्या दोन मिनिटात 35 विषयांना मंजुरी, हा महाराष्ट्रातील आगळावेगळा पॅटर्न केवळ भुसावळ पालिकेचे ‘पेटंट’ ठरू पाहतोय.

डिसेंबर 2011 मधील निवडणुकीनंतर झालेल्या प्रत्येक सर्वसाधारण सभेत याचा अनुभव शहरवासीयांनी घेतला. शहराच्या हिताचे भरगच्च विषय सभागृहापुढे मांडायचे. मात्र त्यावर केवळ विरोधीच नव्हे, तर सत्ताधारी गटातील नगरसेवकांनासुद्धा मत मांडायची संधीच द्यायची नाही, असा ‘रिवाज’ 19 जूनच्या सभेतही कायम होता. केवळ एखाद्या सदस्याने तावातावाने उठून सर्व विषयांना मंजुरी देणे सत्ताधारी गटातील ‘ज्येष्ठ-र्शेष्ठ’ म्हणवून घेणार्‍या अनेक नगरसेवकांना हे न रुचणारे आहे. मात्र, भविष्यातील ‘लोण्याच्या मडक्या’वर डोळा असल्याने त्यांची अवस्था ‘सहनही होईना अन् सांगताही येईना’ अशी झालेली आहे. वरवर विरोध दाखवणार्‍या भाजप - खाविआमधील काही नगरसेवकांची सत्ताधार्‍यांशी असलेली सलगीसुद्धा करणी आणि कथनीमध्ये फरक दाखवणारीच आहे.

जनतेला पडणारे प्रश्न
>मांडलेल्या विषयांची अभ्यासूपणे मांडणी करून विरोधकांना थोपवेल, असा एकही नगरसेवक सत्ताधार्‍यांकडे नाही का ?
> बहुमत असले तरी, सभेत एखादा विषय मतदानाला आल्यास सत्ताधारी गटातील नाराजीमुळे विरोधकांना फायदा होईल. तांत्रिक पराभवाची भीती?
> सभेत विषयनिहाय चर्चा झाल्यास विरोधक भारी पडण्याची शक्यता की, चुकीचे निर्णय सभागृहाच्या माध्यमातून जनतेसमोर उघड होण्याची भीती?
> नगराध्यक्ष उमेश नेमाडे अधिकाधिक अडचणीत यावे. पालिकेची निष्क्रियता जनतेसमोर यावी, यासाठी सत्ताधारी गटातून कुणी कार्यरत आहे का?
स्वार्थी वृत्तीमुळे बसली खीळ

पूर्वीच्या पालिकेत अभ्यासूवृत्तीची माणसे होती. निर्णयात जनहिताला प्राधान्य होते. सत्ताधारी-विरोधी गटात समन्वय होता. आता स्वार्थ साधणारे आयाराम-गयाराम वाढले आहेत. अशा माणसांकडून शहराला अपेक्षा ठेवता येणार नाही. या अवस्थेला दोन्ही गट प्रामुख्याने जबाबदार आहेत.
-मधू साळी, ज्येष्ठ पत्रकार