आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhusawal Municipal Corporation Magic Figure Issue,

भुसावळ नगरपालिकेत मॅजिक फिगर गाठण्यासाठी आतापासून फिल्डिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विजयी झालेले दोन अपक्ष आणि एक मीना आघाडी, असे तीन नगरसेवक सध्या सत्ताधारी राष्ट्रवादीच्या गोटात आहेत. सहा महिन्यांनंतर उमेश नेमाडे यांचा नगराध्यक्षपदाचा अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण होईल. यानंतर नवीन नगराध्यक्ष निवडीत किंवा सध्याची राजकीय स्थिती पाहता बहुमताची मॅजिक फिगर गाठताना अपक्षांचे मोल वधारणार आहे.
नोव्हेंबर 2011 मध्ये झालेल्या पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग पाच ब मधून निर्मल (पिंटू) कोठारी हे अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. राष्ट्रवादीने या प्रभागात उमेदवार दिला नव्हता. प्रभाग सात ब मधून जलील कुरेशी अपक्ष, तर प्रभाग क्रमांक सात क मधून जैबुन्नीसा रोषन या मीना आघाडीकडून दूरदर्शन या चिन्हावर निवडून आल्या होत्या. निवडणुकीत राष्ट्रवादीने 47 पैकी 25 जागांवर निर्विवाद विजय मिळवला. शिवाय दोन अपक्ष आणि मीना आघाडीचा एक असे तीन नगरसेवक राष्ट्रवादीच्या गोटात सहभागी झाले.
सध्या मात्र, शहरातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. भाजप आणि खान्देश विकास आघाडीसोबत राष्ट्रवादीच्या गोटानेही मॅजिक फिगर गाठण्यासाठी आतापासून गुप्तपणे प्रयत्न सुरू केले आहेत. भविष्यातील या घडामोडी पाहता तिघांची भूमिका निर्णायक ठरेल. अनपेक्षितपणे लॉटरी लागून महत्त्वाच्या पदावर वर्णी लागू शकते, अशी चर्चा आहे.
लाभ कोणाला?
अडीच वर्षांनंतरचे नगराध्यक्षपद ओबीसीसाठी आरक्षित आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांनी भावी नगराध्यक्ष मुस्लिमच असेल, असे जाहीर केले होते. तूर्त सत्ताधारी राष्ट्रवादीकडे अपक्ष व पाठिंबा दिलेले मिळून ओबीसीमध्ये येणारे तीन मुस्लिम नगरसेवक आहेत. यापैकी एकाची पदावर वर्णी लागणे शक्य आहे.
आज दोन वर्षे पूर्ण
पालिका निवडणुकीनंतर 26 डिसेंबर 2011 रोजी उमेश नेमाडे यांनी नगराध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. गुरुवारी (दि.26) त्यांच्या कारकिर्दीला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. तर 26 जून 2014 रोजी त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपणार आहे. निर्माण झालेल्या अनंत अडचणींसोबत, विरोधकांसोबतच काही स्वपक्षीयांनी उघडपणे व्यक्त केलेली नाराजी या कार्यकाळाचे विशेष ठरत आहे.
असे आहे संख्याबळ
राष्ट्रवादी - 25
भाजप - 12
खाविआ - 7
मीना आघाडी - 1
अपक्ष - 2